Sun, May 19, 2019 22:33होमपेज › Belgaon › ‘निपाह’पासून बचाव शक्य

‘निपाह’पासून बचाव शक्य

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 24 2018 1:32AMनिपाह व्हायरसचा संसर्ग होऊन केरळमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका नर्सचाही समावेश आहे. हा विषाणू मंगळूरमध्येही पसरला आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने ‘हाय अलर्ट’ जारी केले आहे. बेळगावातदेखील या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांनी दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने निपाह व्हायरसमुळे होणार्‍या रोगापासून दक्षता घेण्याचे आदेश दिले आहत.पुण्यातील नॅशनल इस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने तीन नमुन्याची चाचणी केल्यानंतर निपाहचे निदान केले. 1998 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये निपाह व्हायरसची लक्षणे सर्वप्रथम दिसून आली होती. त्यानंतर 2004 मध्ये बांगला देशमध्ये या रोगाने थैमान घातले होते. निपाह व्हायरस हा रोग वटवाघळांनी उष्टी केलेली फळे खाल्ल्याने होतो. 

झपाट्याने हा रोग पसरतो. त्यामुळे याबद्दल व्यापक जागृती गरजेची आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.  या रोगाचा फैलाव होऊ नये आरोग्य खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य खात्याने केले आहे.

कशी घ्याल काळजी?

सध्या या रोगावर औषध उपलब्ध नाही. झाडाखाली पडलेली फळे व  भाजीपाला इतर ठिकाणी अर्धवट खाल्लेली फळे आढळल्यास ती खाऊ नयेत. पक्षी, प्राणी व जनावरे यांनी खाल्लेली उष्टी फळे खाल्ल्यास हा रोग फैलावतो. विशेषता वटवाघुळ व डुकरामुळे रोग वेगाने फैलावतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही विकार होऊ शकतो.

मंगळुरमध्य दोन संशयित रुग्ण

मंगळूरमध्ये निपाहचे दोन संशयित रुग्ण आढळले आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी एम. रामकृष्णराव यांनी सांगितले.  मंगळूर परिसरात दक्षतेचा इशारा आहे. 

नियंत्रण शक्य : डॉ. अरूणकुमार

निपाह रोगाचा संसर्ग झाल्याचे वेळीच निदान झाले तर संसर्ग थांबविता येत असल्याचे मत केरळमधील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. जी. अरूणकुमार व्यक्त केले आहे. मणिपाल सेंटर फॉर व्हायरस रिसर्च (एमसीव्हीआर) चे ते प्रमुख आहेत.

सुरवात

केरळमध्ये काही दिवसांपूर्वी निपाहचा संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींचा पहिल्यांदा बळी गेला. दोन्ही व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या चाचण्या होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील दुसर्‍या व्यक्तीच्या चाचण्या घेऊन निदान करण्यात आले मात्र, तिचाही उपचाराआधीच मृत्यू झाला.

निपाहची लक्षणे

मेंदूला ताप चढणे, थकवा जाणवणे, शुध्द हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे.

कोमात जाण्याची शक्यता

या आजाराची लक्षणे दिसल्यास 24 ते 48 तासात उपचार सुरु झाले नाहीत तर,  व्यक्ती कोमात जाण्याची शक्यता असते. हा रोग थेट मेंदूशी व श्‍वासनाशी निगडीत असल्याने हृदयविकाराचा धोका असतो.

हे करा

फ्लू सारखी लक्षणे असणार्‍यांनी तपासणी करावी.

संसर्ग झालेल्या व्यक्तीने मास्क, टोपी, हातमोजे घालावेत. 

डुकरांच्या फार्मवरील कर्मचार्‍यांनी जखम, संसर्गावर उपचार घ्यावेत. 

पाणी उकळून प्यावे.

विहिरीवर जाळी बसवावी. वटवाघुळ किंवा इतर पक्ष्यांना विहिरीत जाता येऊ नये, याची दक्षता घ्यावी.

हे टाळा

पक्षी, प्राण्यांनी खाल्लेली उष्टी फळे, वारा किंवा पावसाने खाली पडलेली फळे खाऊ नका.

रस्त्यावर विक्री करण्यात येणारी कापलेली फळे, प्रक्रिया न केलेले खजूर खाऊ नका.

अस्वच्छ हाताने डोळे, नाक चोळू नका.

संसर्ग झालेल्या किंवा आजारी डुकराशी थेट संपर्कात येऊ नका.

वाचा : ‘निपाह’ची लागण तरीही नर्सचे कर्तव्याला प्राधान्य