Fri, Mar 22, 2019 08:31होमपेज › Belgaon › मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी

मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

मार्गशीर्ष पौर्णिमेला होणार्‍या श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेचा शनिवारी मुख्य दिवस असून यात्रेनिमित्त देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, यात्रेसाठी महाराष्ट्र, उ. कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेशातील भाविकांनी गेल्या दोन दिवसांपासूनच गर्दी केली आहे. यावर्षी तब्बल दोन लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.

शनिवारी होणार्‍या यात्रेसाठी गेल्या आठवडाभरापासून सौंदत्ती डोंगरावर भाविकांचे जथ्थ्ये दाखल होऊ लागले होते. गेल्या दोन दिवसांत डोंगरावर यात्रेकरुंची मोठी गर्दी होताना दिसत आहे. कोल्हापूरसह अन्य भागातील रेणुका भक्‍त जग  घेऊन सौंदत्ती डोंगराकडे रवाना झाले आहेत. आगामी दोन दिवस होणारी गर्दी पाहून भाविक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभावी कुंडावर स्नान उरकून भाविक जोगेश्‍वरी सत्यव्वा देवीचे दर्शन घेऊन लिंब नेसण्याचा कार्यक्रम उरकून  डोंगरावर दाखल होत आहेत. शनिवारी भरपौर्णिमेला विविध धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी कंकण-मंगळसूत्र विसर्जनाचा विधी होणार आहे. रविवारी अभिषेक, महापूजा, आरती व पालखी सोहळा होणार आहे. 

यात्रेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून  स्वच्छता व इतर कामांवर लक्ष ठेवण्यात आले असून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची जातीने दखल घेण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दिली. डोंगरावरील यात्री निवास भाविकांनी भरून गेले असून खुल्या जागेवर राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. भंडार्‍याच्या उधळणीत देवीच्या दर्शनासाठी मंदिराजवळ भाविकांची गर्दी होत आहे. 

यात्रेनिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक परिवहन मंडळातर्फे जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.कोल्हापुरातून मोठ्या संख्येने बस आणि अन्य वाहने येत आहेत. डोंगरावर होणार्‍या रहदारीचा अंदाज घेत पोलिस प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात्रेनिमित्त सौंदत्ती डोंगरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येत आहे. मंदिर व्यवस्थापनातर्फे अधिक सफाई कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. यात्रेकरूंना पाण्याची वानवा जाणवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे, असेही कोटारगस्ती यांनी सांगितले.
यात्राकाळात चोरीचे प्रकार घडत असतात. याकडे लक्ष देऊन मंदिराबरोबरच स्नानकुंड आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसरात अ‍ॅम्बुलन्स आणि प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे.

पारसगडावर गर्दी

सौंदत्ती यात्रेला वर्षभरात येणारे भाविक देवी दर्शनासह यल्लम्मा डोंगरानजीकच्या पारसगडाला आवर्जुन भेट देत असतात. यावर्षीही गेल्या सप्ताहभरापासून डोंगरावर भाविकांचे जथ्थे येत आहेत. शनिवारी सायंकाळी होणार्‍या विधीनंतर बहुसंख्य भाविक रविवारी सकाळी आपापल्या गावाकडे प्रस्थान करत असतात. त्यामुळे प्रस्थानापूर्वीच पारसगड पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.