Sun, May 31, 2020 18:35होमपेज › Belgaon › सौंदत्ती डोंगरावर ‘आई उदो’ चा गजर

सौंदत्ती डोंगरावर ‘आई उदो’ चा गजर

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:23PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सौंदत्ती येथील रेणुका देवीची मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रा जल्लोषात पार पडली. कोल्हापूर, उत्तर कर्नाटक भागातील अडीच लाखांहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रेसाठी दाखल झाले आहेत. देवी दर्शनासाठी आज प्रचंड गर्दी झाली होती.

महाराष्ट्र-कर्नाटक आणि गोवा येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या यात्रेच्या मुख्य दिवशी काल ‘आई उदो’च्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमला होता. सौंदत्ती येथे बेळगाव, कोल्हापूर तसेच उत्तर कर्नाटकासह गोवा आणि आंध्रप्रदेश येथील भाविकांनी पोर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर  आज सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशीही मोठ्या संख्येने भाविक जोगनभावी येथून डोंगरावर येत होते. सकाळी जोगनभावी कुंडावर स्नान व लिंब विधी तसेच सत्यवती देवीची पूजा करून भाविक यल्लम्मा डोंगरावर दाखल झाले. भाविकांनी मुक्काम केलेल्या जागेत पडल्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याचबरोबर वाजतगाजत आणि भंडार्‍याची उधळण करत देवीला आहेर आणि नैवेद्य दाखविण्यात आला. भंडार्‍याची उधळण करत मिरवणुकीने भाविक जथ्थ्याने मंदिराकडे जात होते. 

पहाटेपासूनच मंदिराजवळील कुंडावर भाविकांनी स्नानासाठी प्रचंड गर्दी केली होती. कुंडावर स्नान करून भाविक दर्शनासाठी जात होते. देवी दर्शनानंतर मंंदिरावरील शिखरावर कापूर, खोबरे जाळण्यासाठीही भाविकांनी गर्दी  केली होती. ‘आई उदं उदं’च्या गजराने डोंगर दुमदुमन गेला.    

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे देवीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी पालखी पूजा करण्यात आली. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटरगस्ती यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यात्रेनिमित्त डोंगरावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील दुकानांमध्ये उलाढाल वाढली होती. भाविकांचे जथ्थे, खासगी वाहने तसेच प्रवासी वाहनांमधून मोठ्या संख्येने आल्यामुळे डोंगरावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मंदिराकडे जाणार्‍या मुख्य मार्गावर जाळ्या टाकून रस्ते चारचाकी वाहनांसाठी अडविण्यात आले होते. यामुळे अनेक वाहनधारकांची गैरसोय झाली. 

पाणी आणि दर्शनासाठी झटापट

यावेळीही पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना यातायात करावी लागली. प्रशासनाच्यावतीने पथदीप, स्वच्छता आदी कामावर भर देण्यात आला होता.  दर्शन रांगेतही गोंधळ होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. तरीही लांबचलांब रांगा होत्या. दर्शन रांगेत अधूनमधून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.