Mon, Jun 24, 2019 17:20होमपेज › Belgaon › उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून दोन मुलांचा अंत 

उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून दोन मुलांचा अंत 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:42PMरेंदाळ : वार्ताहर

रेंदाळ येथे सायंकाळी उसाने भरलेली ट्रॉली उलटून त्याखाली चिरडून दोघा शाळकरी मुलांचा अंत झाला. यश संतोष शिंगे (वय 15) व साहिल सागर कांबळे (14, दोघे रा. रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हुपरी-इचलकरंजी मार्गावरील दलित वस्तीजवळून उसाने भरलेला ट्रॅक्टर दत्त कारखान्याकडे जात होता. यश व साहिल दुचाकीवरून घरी निघाले होते. रस्ता ओलांडताना ते ट्रॅक्टरच्या आडवे आले. ट्रॅक्टरचालकाने जोरदार ब्रेक मारल्याने उसाने भरलेली पुढची ट्रॉली दोघांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये यश व साहिल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

यश शिंगे हा 9 वीत, तर साहिल हा 8 वीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर मोटारसायकलवरून फेरफटका मारून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेनंतर ऊस रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, सरपंच विजय माळी, डी. एस. पाटील व गावातील तरुणांनी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली.