Tue, Jul 16, 2019 10:04होमपेज › Belgaon › मंजूर कामांच्या निविदा तातडीने काढा

मंजूर कामांच्या निविदा तातडीने काढा

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 10:39PMबेळगाव : प्रतिनिधी

दोन महिन्याचा कालावधी विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये गेला. यामुळे शहरातील मनपाची विकासकामे खोळंबली. त्या कामांना आता चालना देण्यासाठी महापौर बसाप्पा चिक्‍कलदिन्नी यांनी बुधवारी मनपा आयुक्तांसह अधिकार्‍यांची बैठक घेतली. मंजूर विकासकामांच्या निविदा तातडीने काढण्याचा आदेश आयुक्त कृष्णेगौडा तायण्णावर यांना बजावला. शहरामध्ये गटारींचे बांधकाम, सिडी वर्क्स, रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण, भुयारी गटार योजनेची कामे, जलवाहिनी बदलण्याचे व नवीन टाकण्याच्या कामांच्या निविदा तातडीने काढून ती कामे वेळेत पूर्ण करून घेण्यात यावीत. गेल्या दोन महिन्यात शहरातील नागरिकांची अनेक कामे अडलेली आहेत. ती सर्व कामे निकालात काढण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी आयुक्त व मनपा अधिकार्‍यांना केली. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामांना चालना देण्यात यावी. त्या कामांच्या निविदाही तातडीने काढून प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ करण्यात यावा, असेही त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले. अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजात गुंतले होते. मनपाचा खजिना रिकामा झालेला असून शहरातील केरकचरा उचलणार्‍या वाहनांना डिझेल खरेदी करण्यासही पैसे मनपाकडे नाहीत. परिणामी शहरातील काही ठिकाणची केरकचरा उचल थांबलेली आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मनपाने महसूल वसुलीला प्राधान्याने चालना द्यावी, अशा सूचनाही महापौरांनी अधिकार्‍यांना केल्या.घरपट्टी, जाहिरातीची बिले, भूभाडे, मनपागाळ्यांचे भाडे, वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याची सुचनाही यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना केली. 

बेळगाव शहरातील दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे, शहरात ज्याठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. त्याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी सुचनाही महापौरांनी अधिकार्‍यांना केली. प्रत्येक वॉर्डामध्ये 22 लाख रुपयांची विकासकामे करण्याचा निर्णय मनपाने घेतलेला आहे. त्या कामाना आयुक्तांनी चालना देण्यात यावी, त्याशिवाय शहरातील अनेक ठिकाणचे पथदीप बंद पडलेले आहेत. ते तातडीने दुरूस्त करण्यात यावेत. शहरातील अनेक रस्त्यामध्ये भुमिगत विद्युतकेबल घालण्यासाठी खोदकाम केलेले आहे. त्याठिकाणच्या चरी व्यवस्थीतरित्या बुझविण्यात याव्यात अशा सुचनाही त्यांनी केल्या. या बैठकीला मनपा आयुक्त कृष्णेगौडा तायण्णावर, शहर अभियंता आर. एस. नायक, ,लक्ष्मी निपाणीकर, लेखापाल अधिकारी हट्टी, अभियंता कुलकणीर्र् यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.