बेळगाव : प्रतिनिधी
शहराच्या शांततेलाच समाजकंटकांनी नख लावले असून, रविवारी रात्री उद्भवलेल्या धार्मिक तणावाबद्दल दोन्ही गटांतील 24 युवकांना अटक झाली आहे. त्यापैकी 17 जणांना बळ्ळारी कारागृहात पाठवण्यात आले आहे. अटकेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या चित्रणाचा आधार घेण्यात आला.
रविवारी रात्री घडलेली धार्मिक तणावाची घटना महिन्याभरातील पाचवी असून, त्यानंतर दंगलग्रस्त परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहापुरातील दगडफेकीनंतर काही वेळातच कसाई गल्ली परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्या ठिकाणीही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करीत वाहनांची नासधूस केली होती. रात्रीच्या वेळी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे शहापूर, कसाई गल्ली, कामत गल्ली या भागांत झालेल्या तणावाची माहिती घेतली.
रविवारी रात्री शहापूर आणि कसाई गल्ली परिसरात झालेल्या दगडफेकप्रकरणी मार्केट पोलिसांनी 17 जणांना, तर शहापूर पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. त्यापैकी 17 जणांची बळ्ळारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
रविवारी रात्री शहापूर अळवण गल्ली येथे निघालेल्या वरातीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर शहापूर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शहापूर पोलिसांनी याप्रकरणी झुबेर बशीरअहमद चिकोर्डे (शिवाजीनगर), नावेद इर्फान बेपारी (जेडगल्ली), सचिन चंद्रकांत मेलगे, अजय चंद्रकांत मेलगे, रोहन अनिल कागळे, प्रसाद नारायण बडिगेर व कुणाल विलास कुडूचकर (सर्व रा. अळवण गल्ली, शहापूर) यांना अटक केली आहे.