Wed, Apr 24, 2019 08:20होमपेज › Belgaon › वजन कमी करा, अन्यथा शिस्तभंग कारवाई

वजन कमी करा, अन्यथा शिस्तभंग कारवाई

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 8:09PMबेळगाव : प्रतिनिधी

‘वाढलेले पोट कमी करा, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जा’ असा इशारा ढेरपोट्या पोलिसांना देण्यात आला आहे. कर्नाटक राखीव पोलिस दलाचे (केएसआरपी) अतिरिक्‍त पोलिस महासंचालक भास्कर राव यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पेलताना पोलिसांनी आपले आरोग्य योग्य राखणे गरजेचे आहे. याकरिता दररोज संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. पण, कुणीच याकडे लक्ष देत नाही. याचा परिणाम त्यांच्या सेवेवर आणि कार्यक्षमतेवर होतो. यामुळे काही महिन्यांपूर्वी केएसआरपीतील सर्व पोलिसांना याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. पण, केवळ काही पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले.

परिणामी पुन्हा एकदा परिपत्रक जारी करण्यात आले असून कारवाई अनिवार्य असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  बदलती  जीवनशैली, आहार पद्धत आणि कोणत्याही व्यायामाअभावी पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पोलिस खात्यात काम करत असताना आरोग्यपूर्ण असावे लागते. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळते. उंचीनुसार वजन असणे आवश्यक आहे. पण, अनेक पोलिसांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्यावर नियंत्रणासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.राज्यात केएसआरपीच्या एकूण बारा तुकड्या आहेत. या तुकड्यांमध्ये असणार्‍या ढेरपोट्या पोलिसांचे वजन कमी करण्याची जबाबदारी संबंधित कमांडंटवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक तुकडीतील पोलिसांचे वजन, उंची व इतर माहिती संग्रहित करावी. अधिक वजन असणार्‍यांना बाजूला काढून त्यांना वजनावर नियंत्रणासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

नेमणुकीवेळी तंदुरुस्त

नेमणूक करताना प्रत्येक उमेदवार सुदृढ असतो. पण एकदा सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांचे वजन वाढू लागते. काही वर्षातच अनेकजण ढेरपोटे दिसू लागतात. अलिकडच्या काळात पोलिस म्हणजे मोठे पोट, उंची जेमतेम, खाकी गणवेश असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नेमणूक झाल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी सक्षम बनविले जाते. पण, सेवेत आल्यानंतर विविध कारणांमुळे त्यांचे वजन वाढते. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी सुरू होत असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.