Fri, Nov 16, 2018 04:47होमपेज › Belgaon › कोडगूत 87 वर्षांत विक्रमी पाऊस

कोडगूत 87 वर्षांत विक्रमी पाऊस

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 11:23PMबंगळूर : प्रतिनिधी

कोडगू जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने 87 वर्षांमागील विक्रम मोडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 1931 मधील ऑगस्टमध्ये एकूण 1,559 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या 21 ऑगस्टपर्यंत महिन्यात 1,675 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 768 मि. मी. (45 टक्के) पाऊस 15, 16 आणि 17 या तीन दिवसांत झाला. कोडगूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळेच भूस्खलन आणि दरड कोसळली आहे. एका दिवसात 200 मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 17 रोजी सुमारे 300 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. शिवाय तीन दिवस संततधार पावसामुळे मोठी हानी झाल्याचे हवामान खात्याच्या संचालक गीता अग्‍निहोत्री यांनी कळविले आहे. 

दरम्यान, मडिकेरीतील पूरग्रस्तांनी आधीच्याच ठिकाणी नवी घरे बांधून देण्याची मागणी सरकारकडे  केली असून इतर ठिकाणी स्थलांतरास नकार दर्शविला आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकारमधील समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव आदींनी पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे याबाबतची मागणी करण्यात आली. आतापर्यंत कमवलेले सर्वकाही गमावले आहे. नव्याने जीवन जगावयाचे असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुन्हा पाऊस आल्यानंतर पूर येऊन सर्वकाही नाहीसे होण्याची भीती गुंडुराव यांनी व्यक्‍त केली. पण, जन्मगाव सोडून जाणार नसल्याचा निश्‍चय पूरग्रस्तांनी व्यक्‍त केला.

पूरग्रस्तांकडून किमती वस्तूंचा शोध

कोडगूतील पावसाने उसंत घेतली असून पूरही ओसरला आहे. आता बचावकार्य वेगाने करण्यात येत आहे. अनेकांनी आपले सर्वस्व गमावले आहे. काही गावे पाण्याखाली गेली आहेत. आपल्या घराचे ठिकाण पूरग्रस्त शोधत आहेत. त्या जागी आपल्या मौल्यवान वस्तू मिळतात का, याचा शोध ते घेत आहेत.