होमपेज › Belgaon › बंडखोर-कार्यकर्त्यांत हातघाई

बंडखोर-कार्यकर्त्यांत हातघाई

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:23AMबेळगाव : प्रतिनिधी

सलग दुसर्‍या दिवशी समिती बंडखोरांना मराठी सीमावासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बंडखोर उमेदवार मोहन बेळगुंदकर यांना बहाद्दरवाडीच्या वेशीतच अडवून माघारी पाठवण्यात आले. त्यांचा भगवा फेटाही डोक्यावरून हिसकावून घेण्यात आला. बुधवारी शिवाजीनगरमध्ये बाळासाहेब काकतकरांना लोकांनी जाब विचारला होता.

ग्रामीण भागात बंडखोरी होऊन दोन उमेदवार रिंगणात आहेत. दोघही आपणच समितीचे अधिकृत उमेदवार असल्याचा प्रचारही करत आहेत.  मात्र, मध्यवर्ती समितीने मनोहर किणेकर यांची उमेदवारी घोषित केली असून, बेळगुंदकरांची उमेदवारी बंडखोरांनी घोषित केले आहे. त्यामुळे  बेळगुंदकरांना विरोध होत आहे.  

गुरुवारी सकाळी 9 वाजता बेळगुंदकर बहाद्दरवाडीत प्रचारासाठी येत असल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी त्यांना वेशीतच गाठले. ‘तुम्ही बंडखोरी केली असून तुम्ही गावात यायचे नाही. ग्रामीण भागात म. ए. समितीचा एकच उमेदवार राहावा यासाठी मध्यवर्तीने चार दिवस तुम्हाला पाचारण केले. मात्र तुम्ही बैठकीकडे पाठ फिरविलीत. तुम्हाला आमचा पाठिंबा नाही. तुम्ही येथून निघून जा,’ असे सांगत बेळगुंदकरांना धक्काबुक्की केली. एका कार्यकर्त्यांने त्यांच्या डोक्यावरचा भगवा फेटा बाजूला केला. ‘हा फेटा बांधायची तुमची लायकी नाही’, असेही त्यांना  सुनावण्यात आले. 

बेळगुंदकरांनी कार्यकत्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मला मारणार का? मारणार तर मारा, असेही ते म्हणाले. पण, लोकांनी त्यांचा मार्ग अडवून धरला. त्यामुळे बेळगुंदकरांनी प्रचाराला गावात न जाता तेथूनच काढता पाय घेतला. 

*व्हिडिओ व्हायरल

घटना घडल्यानंतर कांही वेळातच बेळगुंदकराना बहाद्दरवाडी वेशीतून हाकलून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटले. बंडखोराना या वेळेला धडा शिकविलाच पाहिजे. मग ते ताळ्यावर येतील. आता मनमानी खपवून घेणार नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. 

*बंडखोराना विरोध कायम

प्रत्येक मतदारसंघात दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहील्याने बंडखोरांना विरोध वाढतच चालला आहे. त्याबद्दल तिखट प्रतिक्रिया सीमाभागात उमटत आहेत. गुरुवारी तर प्रकरण हातघाईपर्यंत पोचले.