Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Belgaon › काँग्रेसला डोकेदुखी बंडखोरीची 

काँग्रेसला डोकेदुखी बंडखोरीची 

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

मागील दोन विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणलेल्या भाजपला यावेळी रायबाग मतदारसंघात कडवी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून भाजपसमोर तगडे आव्हान देण्यात आले आहे. मात्र काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजपने यावेळी पुन्हा एकदा आ.दुर्योधन ऐहोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून हॅट्ट्रिक साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तर काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. यासाठी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराला घाम फोडलेल्या प्रदीप माळगी यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

परिणामी येथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे महावीर मोहिते यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे काँग्रेसच्या हातातोंडाला आलेला विजयाचा घास दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बसपानेदेखील याठिकाणी राजू कांबळे यांना उमेदवारी दिली आहे.हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. याचा फायदा घेऊन भाजपाने 2008 साली एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या मतदारसंघात चांगलेच बस्तान बसविले. माजी मंत्री व्ही. एल. पाटील यांच्या विचाराचा पगडा असणार्‍या मतदारसंघावर भाजपने पकड निर्माण केली आहे.

भाजपला 2013 च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार प्रदीप माळगी यांना केवळ 829 इतक्या अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला.यावेळी माळगी हे काँग्रेसच्या गळाला लागले असून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. तर दलित चळवळीतून पुढे आलेले महावीर मोहिते यांनी बंडाचा झेंडा उभा केला आहे. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. या जोरावर ते काँग्रेसच्या मतांची विभागणी करू शकतात. याचा फटका माळगी यांना बसण्याची शक्यता आहे.

प्रदीप माळगी हे दुर्योधन ऐहोळे यांना कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला विजय मिळविण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. काँग्रेसने बंडखोराकडून होणारे मतांचे विभाजन रोखल्यास भाजप उमेदवाराची  हॅट्ट्रिक रोखण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मतदारसंघात 56 हजार इतकी मते लिंगायत समाजाची आहे. त्या खालोखाल 42 हजार धनगर, 21 हजार अनुसूचित जाती, 21 हजार अनुसूचित जमाती, 22 हजार मुसलमान, 8 हजार जैन तर 6 हजार मराठा समाजाची मते आहेत.

लिंगायत समाजाने आजवर भाजपला पसंदी दिली आहे. मात्र स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी छेडलेल्या आंदोलनानंतर समाजात वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. यामुळे लिंगायत मतांची विभागणी होण्याची शक्यता असून परिणामी याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरच विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.