Sat, Jul 20, 2019 02:39होमपेज › Belgaon › रयत संपर्क केंद्र आता हक्काच्या घरात

रयत संपर्क केंद्र आता हक्काच्या घरात

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 10:44PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

गेल्या 22 वर्षापासून भाडोत्री जागेत कार्यरत असलेल्या येथील रयत संपर्क केंद्राची हक्काची इमारत व गोडावूनसाठी राज्य सरकारने 4 गुंठे जागा व 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पैकी 17 लाखांची रक्कम कार्यालयाच्या नावे वर्ग झाले असून शुक्रवारी या केंद्र इमारतीच्या जागेचे  आ. शशिकला जोल्ले यांच्या हस्ते भूमिपूजन  झाले.

निपाणी-मुरगूड रोडला लागून रयत संपर्क केंद्राची वास्तू व गोडावून धारवाड कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र आवारात उभारणार आहे. या केंद्राची हक्काची इमारत व्हावी यासाठी दै. ‘पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा चालविला होता. या खात्याचे कामकाज यापुढील काळात अधिकच गतिमान होणार आहे. मतदारसंघातील जवळपास 30 गावांसाठी याठिकाणी रयत संपर्क केंद्राचे कामकाज याठिकाणी सुरू आहे. गेल्या पाच वर्षापासून या कार्यालयाचे कामकाज कृषी संशोधन केंद्रातील दोन रूममध्ये सुरू होते. मात्र  गोडावूनसाठी जागाच नसल्याने आजतागायत शहर परिसरातील खासगी गोडावून व इमारतींमध्ये खते बियाणे, शेती अवजारे ठेवून सेवा सुरू होती. या खात्याच्या स्वतंत्र इमारतीसाठी तत्कालीन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खा. प्रकाश हुक्केरी, आ. शशिकला जोल्ले यांनी पाठपुरावा केला. या इमारतीचे टेंडर अभियंते नदाफ यांना मिळाले.

कार्यालयात कृषी अधिकारी परगौडा पाटील यांच्यासह चार सहाय्यक कृषी अधिकारीकार्यरत आहेत. तर इतर विभागातील कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत.त्यामुळे खरीप वा रब्बी काळात योजना व सवलतींचा प्रचारासाठी आहे त्या कर्मचार्‍यांना दैनंदिन व्याप सांभाळत 30 गावांचा दौरा करावा लागत आहे. रयत केंद्रातील सहाय्यक कृषी अधिकारी बी. एस. यादवाड म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यामुळे सरकारने जागा व निधी दिला आहे. 

स्वत:ची इमारत नसल्याने गेल्या काही वर्षापासून खात्याच्या अधिकार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत खात्याने खरीप वा रब्बी हंगामात वेळोवेळी लागणारी बियाणे, कीटकनाशके, औषधे, शेती अवजारांचा पुरवठा केला. यापुढील काळात वाहतुकीच्या दृष्टीने कार्यालयाची स्वतंत्र वास्तू नजीकच होणार असल्याने रयत संपर्क केंद्राला हक्काचा निवारा प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांना मोठे समाधान मिळाले आहे.