Sat, Jul 20, 2019 11:02होमपेज › Belgaon › रेशन दुकानदाराचा मुलगा बनला शास्त्रज्ञ

रेशन दुकानदाराचा मुलगा बनला शास्त्रज्ञ

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 8:19PMनिपाणी : मधुकर पाटील 

निपाणीतील रेशन दुकानदाराचा मुलगा  असलेल्या प्रवीण अशोक पावले याची केंद्र सरकारच्या मुंबईतील प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून निवड़ झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत प्रवीणने यशाचे शिखर गाठले असून,  निपाणीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रवीणचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर संस्थेत झाले असून बारावीपर्यंतचे शिक्षण अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजमध्ये झाले. त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कणकवली येथील एसएसपीएम कॉलेजमधून  घेतले. नंतर पुण्यातील व्हीआयटी संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये एम. टेक पदवी घेतली.  त्यानंतर केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अनुसंधान संस्थेमध्ये संशोधन शास्त्रज्ञ (रिसर्च सायंस्टिट) म्हणून त्याची निवड झाली.

शेकडो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. लेखी, तोंडी परीक्षेच्या आधारे त्याने हे यश संपादन केले. ईएनटीसी या महत्वाच्या विभागात संशोधन व मागदर्शन करण्याची संधी या निवडीमुळे प्रवीणला प्राप्त झाली आहे. प्रवीणचे वडील अशोक पावले हे पैलवान म्हणून परिचित असून त्यांनी यापूर्वी कुस्तीमैदाने गाजवली आहेत. ते निपाणीत रेशनदुकान चालवित असून मुलाच्या यशामुळे कष्टाचे चीज झाल्याचे म्हटले आहे. त्याची आई अरुणा सेवानिवृत नर्स आहेत. प्रवीणने या यशात सर्व मागदर्शक, गुरूवर्य तसेच आई-वडिलांचे मागदर्शन व प्रोत्साहन लाभले असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.