Thu, May 23, 2019 20:50
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मलबारीच्या ताब्यासाठी हालचाली

मलबारीच्या ताब्यासाठी हालचाली

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 07 2018 12:11AMबेळगाव : प्रतिनिधी

रोहन रेडेकरच्या खूनप्रकरणी बेळगाव पोलिसांना हवा असलेला रशीद मलबारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी बेळगाव पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

गुंड छोटा शकीलचा हस्तक असलेल्या रशीद मलबारीला नकली पासपोर्ट बाळगल्याच्या कारणावरून अबुधाबीमध्ये मे महिन्याच्या अखेरीस अटक करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात असला तरी मुंबई पोलिसांनी त्याबद्दल माहिती देणे टाळले आहे.  

रशीदने बेळगावातही अनेक गुन्हे केले आहेत.  प्र्रसिद्ध चिंच व्यापारी महादेव रेडेकर यांचा पुत्र रोहनचे 18  फेब्रुवारी 2015 रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. खंडणीसाठी हा प्रकार झाला होता. प्रत्यक्षात महादेव रेडेकरांचे अपहरण होणार होते; पण चुकून रोहनचे अपहरण केल्यानंतर रशीद व त्याच्या साथीदारांनी त्याचा खून करून मृतदेह कणकुंबी जंगलात टाकला होता. 

तब्बल दोन वर्षांनंतर 14 मे 2017 मध्ये खुन्यांचा पत्ता लावण्यात सीसीबीच्या पोलिसांना यश आले होते. त्यानंतर पाच जणांना अटक कण्यात आली होती. या प्रकरणी माजी जि.पं.अध्यक्ष नजिर नदाफलाही अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून रशिद मलबारी सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी रशिद मलबारीचा तपास जारी ठेवला होता. 

पोलिसांना चकवा देउन त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने पश्‍चिम बंगालमधून बांगलादेशमार्गे अरब राष्ट्रांत पलायन केले होते. मेअखेरीस बनावट कागदपत्रे व पासपोर्ट सापडल्याने त्याला अबुधाबीत अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. बेळगावमध्ये त्याच्यावर खून व खंडणीचे  गुन्हे दाखल असून त्याला बेळगावला आणण्यासठी बेळगाव पोलिस प्रयत्नशील आहेत. तथापि, बेळगाव पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले.

अबुदाधीमध्ये बांगलादेशाचा पासपोर्ट तयार करुन वावरणार्‍या मलबारीला अटक करण्यात आली आहे.  बेळगावमध्ये त्याच्यावर खुनाचे गुन्हे असून, लवकरच बेळगावला आणण्यात येईल.  सीमा लाटकर, पोलिस उपायुक्‍त