Fri, Jul 19, 2019 01:20होमपेज › Belgaon › दुर्मीळ नाणी, नोटा संग्रहाचा अनोखा छंद

दुर्मीळ नाणी, नोटा संग्रहाचा अनोखा छंद

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 12:50AMनिपाणी : विठ्ठल नाईक

समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. अंगी असलेले छंद जोपासत काम करण्यात अनेकांना धन्यता आणि समाधान वाटते. अशाचप्रकारे येथील प्रगतीनगरातील रहिवासी पदवीधर अक्षय तांबेकरने दुर्मीळ नाणी, विदेशी नोटांच्या संग्रहाचा छंद जोपासला आहे. त्यातून प्राचीन काळापासूनची चलन व्यवस्था जाणून घेण्यास मदत  होते.

प्राचीन काळातील नाणी, विदेशी नोटा संग्रहाचा छंद जोपासून अक्षय तांबेकरने सुमारे 20 देशातील चलनातील सुरुवातीपासूनची नाणी व नोटांचा संग्रह केला आहे. संग्रहित नाणी व नोटांची माहिती विविध ठिकाणी प्रदर्शन भरवून देण्याचा मानस असून शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहासातील आणि सध्याची विविध देशातील चलनव्यवस्था समजण्यास  मोठा लाभ मिळेल, असा आशावाद  अक्षयने व्यक्त केला.

अक्षयचे कार्य युवकांना प्रेरणादायी असून इतिहासाच्या अभ्यासाची आवड असल्याचेही त्याने सांगितले. बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेला अक्षय  सध्या केबल नेटवर्कींगचे काम करत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून कर्नाटक-महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो. त्यातून आपले मित्र, नातेवाईक व संबंधितांकडून मिळणारी दुर्मीळ नाणी, विदेशी नोटांचा संग्रह करण्यास मदत होत असल्याचे त्याने सांगितले. अक्षयकडे मलेशिया, नेपाळ, अफगाणिस्तान, इजिप्त, भूतान, इराण, व्हिएतनाम, कंबोडिया, जपान इत्यादी सुमारे 20 देशातील नाण्यांचा व नोटांचा संग्रह आहे. त्यामध्ये 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100, 500, 1 हजार, 5 हजार, 10 हजार रुपयांच्या नोटांचा संग्रह आढळून येतो. अक्षयने जोपासलेल्या या छंदातून निपाणीसह परिसरात विविध ठिकाणी प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. याकामासाठी अक्षय तांबेकरला इतिहास विषयाचे प्रा. राहूल घटेकरी, इतिहास विषय शिक्षक आदींचे सहकार्य लाभले आहे.

हायस्कूलचे शिक्षण घेत असल्यापासून नाणी संग्रहाचा छंद आहे. इतिहास अभ्यासाची आवडही असून दुर्मीळ नाणी व विदेशी नोटा संग्रहातील विविध देशातील चलन व्यवस्था सध्याचे विद्यार्थी व युवकांना समजू शकेल. विविध प्रदर्शनातून नाणी व नोटांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. प्राचीन, मध्ययुगीन काळासह आधुनिक काळातील सुमारे 20 देशातील नाण्यांचा संग्रह आहे. -अक्षय तांबेकर, निपाणी