Tue, Jul 07, 2020 21:28होमपेज › Belgaon › ‘निपाह’ म्हणजे काय रे भाऊ?’

‘निपाह’ म्हणजे काय रे भाऊ?’

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 8:38PMबेळगाव : प्रतिनिधी

‘निपाह’ म्हणजे काय रे भाऊ? आम्हाला तर काहीच माहीत नाही. रोज  रानमेवा बाजारात घेऊन येतो. आम्ही निपाह शब्दच ऐकला नाही...’ ग्रामीण भागातून येणार्‍या विक्रेत्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. तसेच खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाही निपाहची कल्पना नाही. रानमेवा विक्रीवर निपाहमुळे काही परिणाम झाला का, याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

बेळगाव व खानापूर तालुक्यातून नरगुंदकर भावे चौक, अनंतशयन गल्ली, रविवार पेठ येथे मोठ्या प्रमाणात रानमेवा बाजारात येतो. मात्र यंदा तालुक्यातील जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने रानमेवा बाजारात येण्यात घट झाली आहे. तीन वर्षापूर्वी बाजारात रोज रानमेवा घेऊन येणार्‍या विक्रेत्यांची संख्या 500 होती.  आता यामध्ये घट होऊन ती 300 वर येऊन ठेपली आहे. रेल्वेतून रानमेवा मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्या ठिकाणी खरेदीदार मोठ्या प्रमाणात रानमेवा खरेदी करत असतात. यंदा रानमेवा बाजारात कमी आला असला तरी, निपाहबाबत विक्रेते, घाऊक खरेदीदार मात्र अनभिज्ञ आहेत. दररोज येणार्‍या रानमेव्यावर शंभरहून अधिक व्यापारी अवलंबून आहेत. दररोज लाखो रुपयाची उलाढाल या व्यापारात होत असते. 

रेल्वेतच रानमेवा खरेदी

रेल्वेतून विक्रेते रानमेवा घेऊन विक्रीसाठी येतात. परराज्यात पाठविताना होणारा खर्च लक्षात घेऊन घाऊक खरेदीदार रेल्वेतच रानमेवा खरेदी करतात. यामुळे बेळगाव बाजारपेठेत रानमेव्याची आवक घटली आहे.

ग्रामीण भागातून रानमेवा घेऊन येणारे विक्रेते निपाहबाबत अनभिज्ञ आहेत. त्यांना रोगाबद्दल माहिती नाही. रानमेवा मोठ्या प्रमाणात खरेदी  करणार्‍या व्यापार्‍यांनाही माहिती नसल्याचे दिसून आले. 
बेळगावातून रानमेवा परराज्यात बेळगाव बाजारपेठेत खानापूर, बागलकोट, विजापूर, यरगट्टी, लोकापूर, चिकोडी या भागातून रानमेवा बाजारात येतो. येथून गोवा, मुंबई, पुणे या मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठविला जातो.