Tue, Apr 23, 2019 19:54होमपेज › Belgaon › कोविंद ठरणार बेळगावला येणारे सहावे राष्ट्रपती

कोविंद ठरणार बेळगावला येणारे सहावे राष्ट्रपती

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 10:41PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक लॉ सोसायटीच्या 15 सप्टेेंबरच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. त्यांच्या बेळगाव भेटीच्या जोरदार स्वागताची तयारी सुरू असतानाच शहरातील खराब रस्त्यांची चिंता मात्र वरिष्ठ  अधिकार्‍यांंना लागून रहिल्याचे दिसते.

या दौर्‍यानिमित्त जिल्हा प्रशासनाने आतापयर्ंत दोन ते तीन बैठका घेऊन आढावा घेतला व त्यामधील काही मुख्य अडसर दूर करण्याबद्दल उपस्थितांच्या सूचना व अडचणींचा आढावा घेऊन त्या दूर करण्याबाबतचा निर्णय घेतला. या अमृतमहोत्सव कार्यक्रमास सरन्यायाधीश दीपक मिश्रा, राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, अ‍ॅडव्होकेट जनरल के. के. वेणुगोपाल, जी. टी. देवेगौडा, महसूल खात्याचे मंत्री आर. व्ही. देशपांडे व उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, आमदार, खासदार आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला वेग आला आहे. रस्त्याच्या डागडुजीबरोबरच स्वच्छतेच्या कामालाही पालिका प्रशासनाने अग्रक्रम दिल्याचे दिसते. एकूणच राष्ट्रपतीच्या एका दौर्‍यामुळे शहराचे चित्र पालटण्यास मदत होणार आहे. वृत्तपत्रांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचीच छायाचित्रे दृष्टीस पडतात. त्यामुळेच बेळगावची प्रतिमा हे शहर खड्ड्यांचेच असल्याचे चित्र तयार होते. राष्ट्रपतींचा हा पहिलाच बेळगाव दौरा असल्याने तो निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी अधिकारीवर्गाने त्याची आधी काळजी घेतल्याचे चित्र दिसते. दौर्‍यापूर्वीच शहरातील सर्वत्र झळकणारे डिजिटल फलक व अन्य जाहिरात फलक प्रशासनाने हटविले आहेत. राष्ट्रपतींच्या या दौर्‍याच्या सुरक्षादृष्टीने अधिक काळजी घेण्यात आली असून स्थानिक पोलिस प्रशासन त्या कामात गुंतले आहे.

राष्ट्रपतींच्या या नियोजित दौर्‍याचा कार्यक्रम निश्‍चित झाला असला तरी ‘प्रोटोकॉल’च्या निमित्ताने या दौर्‍याचा अधिकृत कार्यक्रम तपशील लवकरच जाहीर होईल. राष्ट्रपती बंगळूरहून बेळगावला येणार असल्याने त्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोगटे कॉलेजपासूनच जवळच  ‘हेलीपॅड’ची व्यवस्था तयार ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

रामनाथ कोविंद हे बेळगावला येणारे सहावे राष्ट्रपती आहेत. यापूर्वी रानडे मंदिराच्या कार्यक्रमास राष्ट्रपती कै. एस. राधाकृष्णन यांची उपस्थिती लाभली होती. त्यानंतर मराठा मंडळाच्या कार्यक्रमास राष्ट्रपती कै. झेलसिंग व राष्ट्रपती कै. अब्दुलकलाम उपस्थित होते. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा हे विश्रांतीसाठी सांबरा विमानतळावर उतरले होते. तसेच रामकृष्ण मिशन आश्रमच्या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले होते.  

राष्ट्रपती कोविंद यांच्या दौर्‍यावेळी राष्ट्रपती भवनचे विशेष सुरक्षा पथक राहणार असून त्यांचे आगमन दोन दिवस आधी होणार आहे. त्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. कर्नाटक लॉ सोसायटीचे पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.