Wed, May 22, 2019 06:37होमपेज › Belgaon › ट्रक कार अपघात 2 ठार 6 जखमी

ट्रक कार अपघात 2 ठार 6 जखमी

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:14AM

बुकमार्क करा
रामनगर  : वार्ताहर 

कर्नाटकातून गोव्याकडे जाणार्‍या भरधाव सिमेंटवाहू ट्रकने समोरून जाणार्‍या कारला जोरदार ठोकरल्याने कारचा चेंदामेंदा होऊन कारचालक विजयकुमार जाधव (वय 25, रा. तेलंगणा) आणि अवघ्या दीड वर्षाची बालिका जागीच ठार झाली असून, सहाजण जखमी झाले आहेत.  हा अपघात शनिवारी रात्री 12.30 वा.च्या सुमारास गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ए वर दूध सागर मंदिराजवळील धोकादायक वळणावर घडला. या कारमधून चार महिला आणि चालकासह 8 जण प्रवास करीत होते. या दिवसात दाट धुक्यामुळे अनमोड घाटात लाईट पेटवूनसुद्धा स्पष्ट दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. त्यातच वाहनांची गर्दी वाढली आहे. 

अपघाताची खबर पोलिसांना मिळताच पोलिस पथकाने आणि अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अपघातात सापडलेल्या कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी कारचे पत्रे कटरने कापण्यात आले. जखमींना रात्री 2.50 वा. उपचारार्थ पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात दाखल करण्यात आले.  अपघातातील मृत बालिका अक्षताच्या आई-वडिलांना मार लागला आहे. कोलेम पोलिस ठाण्याचे निरीक्षक दासतोडकर, उपनिरीक्षक सर्वेश सावंत आणि सदानंद देसाई यांनी  अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.