Thu, Jun 20, 2019 02:13होमपेज › Belgaon › जारकीहोळींना पुजारींनी फोडला घाम

जारकीहोळींना पुजारींनी फोडला घाम

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:48PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना विजयासाठी  गोकाक मतदारसंघात प्रथमच कडवी झुंज द्यावी लागली. भाजपच्या अशोक पुजारी यांनी त्यांना शेवटपर्यंत झुंजवले. यामुळे जारकीहोळी यांना विजय मिळेपर्यंत घाम फुटला होता.जारकीहोळी यांना 90 हजार 249 तर पुजारी यांना 75 हजार 969 मते मिळाली.  

गोकाक मतदारसंघ जारकीहोळी बंधूंचा हक्‍काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येथून रमेश जारकीहोळी पंचवीस वर्षापासून सातत्याने निवडून येतात. त्यांच्यासमोर प्रबळ उमेदवार नसल्यामुळे त्यांचा विजय सहज होत असे. मात्र यावेळी भाजपने निदजचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पुजारी यांना उमेदवारी देऊन आव्हान दिले होते. त्यांच्या प्रचारासाठी येडियुराप्पा यांची सभा गोकाकमध्ये घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली होती. यामुळे जारकीहोळी यांना विजय मिळविताना कसरत करावी लागली.

जारकीहोळी यांनी पुजारी यांचा 15 हजार मतांनी पराभव केला. मतमोजणीला सुरुवात होताच पुजारी यांनी आघाडी घेतली होती. यामुळे जारकीहोळी समर्थकांमध्ये घबराट पसरली होती. शेवटपर्यंत जारकीहोळी, पुजारी यांच्यात लढत रंगली होती. विजयासाठी जारकीहोळी यांना अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

जारकीहोळी मागील पाच वेळा येथून विजयी झाले आहेत. या काळात त्यांचे विकासकामाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप मतदारांतून करण्यात येत आहे. यातून त्यांच्याविषयी असमाधान पसरले आहे. त्याला हेरून भाजपने पुजारी यांच्यामाध्यमातून तगडा उमेदवार दिला. यामुळे जारकीहोळी यांना विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अ‍ॅड. पुजारी यांनी निजदतर्फे यापूर्वी जारकीहोळी यांच्याशी लढत दिली होती. मात्र इतके मताधिक्य त्यांना मिळविता आले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी जारकीहोळींसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्याला बळ देण्याचे काम भाजपने केले. जारकीहोळी यांना यापुढे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.