होमपेज › Belgaon › रमेश जारकीहोळी, आरव्हींना मंत्रिपद

रमेश जारकीहोळी, आरव्हींना मंत्रिपद

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:46AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकातील मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार बुधवारी 6 जून रोजी करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातून रमेश जारकीहोळी, कारवार जिल्ह्यातून आर. व्ही. देशपांडे यांच्यासह 25 जणांना राज्यपाल वजूभाई वाला यांनी मंत्री म्हणून पद आणि गोनियतेची शपथ दिली. त्यामध्ये काँग्रेसचे 14, निजदचे 9, केपीजेपी आणि बसपच्या एका आमदाराचा समावेश आहे. मंत्रिमंडळात एकमेव महिलेचा समावेश असून विधान परिषद सदस्या आणि अभिनेत्री जयमाला यांना मंत्रिपदाचे भाग्य लाभले. दरम्यान, पहिल्या यादीत मंत्रिपद हुकलेले ज्येष्ठ नेते एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, बसवराज होरट्टी यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.

पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेस-निजद युती सरकार स्थापन झाल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री आणि डॉ. जी. परमेश्‍वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता एकूण 27 पदे भरली गेली असून, आणखी 7 पदे रिक्‍त आहेत. यापैकी निजदला एक आणि काँग्रेसला पाच पदे भरता येतील. मंत्रिपद न मिळाल्याने निर्माण होणार्‍या संभाव्य नाराजीचा विचार करून काँग्रेसने आणखी एका टप्प्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला.

बहुतेक मंत्र्यांनी ईश्‍वराच्या नावे शपथ घेतली. तर महेश यांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या नावे शपथ घेतली. जमीर अहमद यांनी इंग्रजीत शपथ घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. 

काँग्रेसचे सतीश जारकीहोळी, एच. के. पाटील, एम. बी. पाटील, रोशन बेग, रामलिंगारेड्डी, दिनेश गुंडुराव, एच. एम. रेवण्णा, ईश्‍वर खंड्रे यांच्यासह काहीजण सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. निजदचे बसवराज होरट्टी, अरकलगुडू विश्‍वनाथ, सत्यनारायण यांनाही मंत्रिमंडळात डावलल्याने समर्थक नाराज आहेत.

जातनिहाय हिशेब : जातनिहाय हिशेब घालून मंत्रिमंडळ स्थापन झाल्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. वक्‍कलिंग 9, लिंगायत 4, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक कोट्यातून प्रत्येकी 3, धनगर 2, अनुसूचित जमाती, उप्पार, इडिग, ब्राह्मण समाजातील प्रत्येकी एका आमदाराला मंत्रिपद देण्यात आले.