Tue, Apr 23, 2019 23:45होमपेज › Belgaon › आजी-माजी आमदारांमध्ये चुरस

आजी-माजी आमदारांमध्ये चुरस

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 8:34PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या रामदुर्ग मतदारसंघामध्ये काँग्रेस व भाजपमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यासाठी आजी -माजी आमदार सज्ज असून त्यांना अन्य उमेदवारांनी जेरीस आणले आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे स्थान असणारे आ. अशोक पट्टण यांची या ठिकाणी कसोटी लागली आहे. त्यांनी येथून सलग दोन वेळा विजय मिळविला असून तिसर्‍या वेळी विजय संपादन करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी आ. महादेवप्पा यादवाड  रिंगणात आहेत.

यादवाड यांना मागील दोन विधानसभा निवडणुकीत पट्टण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. याचे उट्टे काढण्यासाठी भाजपने तयारी चालविली आहे. परंतु या ठिकाणी त्यांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. रमेश पंचगट्टीमठ यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे भाजपला विजयाचे गणित घालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आ. अशोक पट्टण यांना सिद्धरामय्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. ते विधिमंडळात काँग्रेसचे प्रतोद म्हणून कार्यरत होते. त्या जोरावर अनेक कामे त्यांनी केली आहेत. या जोरावर विजय संपादन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सत्ताकाळात काही कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यांच्याकडून पट्टण यांची डोकेदुखी वाढविण्यात आली आहे. यामुळे बेरजेचे राजकारण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भाजपला बंडखोरीचे थेट आव्हान आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संगय्या पंचगटीमठ यांचे बंधू रमेश यांनी बंड केले आहे. संगय्या यांनी 16 हजार मते घेतली होती. यावेळी रमेश यांना किती मिळतात यावर भाजपचे यश अवलंबून आहे. सध्या रमेश यांना काही शेतकरी संघटनांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांना भाजपच्या कोणत्याही सक्रिय कार्यकर्त्यांचा पाठिंबा नाही. मात्र ते शेतकरी चळवळीत मागील काही वर्षापासून सक्रिय असल्यामुळे शेतकर्‍यांची मते मिळवू शकतात.

एम. जावेदसाब यांनीदेखील निवडणुकीत नशीब आजमावून पाहण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र ते उपरे असल्यामुळे ते किती मते मिळवू शकतात, याबाबत तर्क मांडण्यात येत आहे. त्यांना मुसलमान समाजाची मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय असून त्यांच्या पाठिंब्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. भाजपचे परंपरागत मतदार असणार्‍या या समाजात स्वतंत्र धर्माच्या मागणीवरून फूट पडली आहे. त्यामुळे हा समाज आपली मते कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात टाकतो, यावर विजय निश्‍चित होणार आहे.