होमपेज › Belgaon › सुपा धरणाची पातळी उंचावली

सुपा धरणाची पातळी उंचावली

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 9:06PMदांडेली : प्रतिनिधी

तब्बल पाच वर्षानंतर कारवार जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील सुपा धरणाची जलपातळी उंचावली आहे. यंदाच्या मान्सूनमुळे ही किमया साध्य झाली आहे.

2013 नंतर या धरणाने आपली अत्युच्च जलपातळी गाठली आहे. काळी नदीवरील बहुतेक सर्व जलऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिमाचल प्रदेशातील भाकरा नानगल धरणाचे साम्य सुपा धरण दर्शविते. काळी नदीवर 1987 मध्ये हे धरण गणेशगुडीजवळ बांधण्यात आले. कर्नाटकातील हे सर्वात मोठे दुसरे धरण आहे. याची जलधारण क्षमता 145 टीएमसी इतकी आहे. लिंगनमक्‍की जलायशयाची 151 टीएमसी इतकी आहे.

सुपा धरण हे कर्नाटक ऊर्जा महामंडळाने बांधले आहे. यातून वीज निर्मितीचा उद्देश आहे. या नदीवर हैड्रोइलेक्ट्रिीक निर्मिती केंद्रे आहेत. या चारही केंद्रांची वीज निर्मिती 1270 मेगावॅट इतकी आहे. ती एकूण राज्याच्या ग्रीडपैकी दहा टक्के इतकी आहे. 31 वर्षाच्या कालखंडात हे धरण फक्‍त सहावेळा भरले आहे. 1987 मध्ये 564 मीटर उंचीच्या धरणाचे काम सुरू झाले. ते 2006 मध्ये पूर्ण करण्यात आले. या धरणाजवळ 100 मेगावॅटची दोन वीजकेंद्रे आहेत. पण त्यातून नियमितपणे ऊर्जा निर्मिती होत नाही. नागझरी केंद्र, कोडसळ्ळी आणि कद्रा ऊर्जा केंद्रांना सुपा धरण हे वरदान ठरले आहे. कारण या तिन्ही धरणांची जलपातळी खालावल्यास सुपा धरणातून पाणी या केंद्रांसाठी सोडले जाते.

या धरणाचे पाणी ऊर्जा केंद्रांना तर दिले जातेच. शिवाय दांडेली, हल्याळ आणि धारवाड जिल्ह्यातील काही भागाची तहान भागवते, अशी माहिती मुख्य अभियंता टी. आर. निंगण्णा यांनी दिली. गुरुवारी या धरणाची जल पातळी 105 टीएमसी इतकी होती. ती जलक्षमतेच्या 72 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा भरपूर पाऊस झाल्याने धरणाची जलपातळी उंचावण्यास मदत झाली आहे. धरणामध्ये 8 हजार क्युसेक इतके पाणी वाहून येत आहे. हा प्रवाह वाढल्यास येत्या 20 दिवसात धरण ओव्हरफ्लो होईल, असेही निंगण्णा म्हणाले.