Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Belgaon › ’भूजल पातळी’साठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’

’भूजल पातळी’साठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 8:27PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात दरवर्षी दुष्काळ पडतो. नद्या, नाले, तलाव, जलाशये कोरडी पडतात. यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येकाने पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. शासनानेही लक्ष देऊन जागृती करायला हवी. 

जिल्ह्यात एप्रिल-मे च्या दरम्यान भूजलपातळी खालावते. यामुळे शहरी व ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा कोठून कसा करावा, या  समस्येने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.  भूपृष्ठावरील वाहते पाणी अडविणे व मुरविणे हा यावर प्रभावी उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. यासाठी आतापासूनच हा प्रयोग करणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होतो, त्यावेळी बेळगाव शहरातील नागरिकांनी व शासकीय संस्थांच्या अधिकार्‍यांनी इमारतीवरून पडलेले पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यामुळे भूजल पातळी वाढण्यासाठी मदत होते.   

बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यातील नाल्यावर लहान बंधारा बांधून पाण्याचा साठा करून ठेवावा. अशा तलावामध्ये पावसाळ्यात पाणी साठून राहते. त्याचा वापर पावसाळ्यानंतर जलसिंचनासाठी किंवा गरज भासली तर  पिण्यासाठी, जनावरांसाठी करता येतो. याप्रकारे दरवर्षी येणार्‍या पावसाळ्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची प्रक्रिया प्रभावी पद्धतीने राबविली पाहिजे. दुष्काळ पडला तर त्यावर मात करता येऊ शकते. कूपनलिकांद्वारे भूजलाचा वापर करता येऊ शकतो. 

दरवर्षी उपलब्ध होणारे पावसाचे पाणी नाहक वाहत जाते. ते तलाव, नाल्यावरील व नद्यावरील बंधार्‍यामध्ये साठवून ठेवले पाहिजे. केवळ जलाशये भरली म्हणून पाणी साठविण्याची प्रक्रिया बंद  होता कामा नये. नद्यांवर आवश्यक त्या ठिकाणी ब्रिज कम बंधारे उभारून पाण्याचा साठा करण्याची नितांत गरज आहे. 

राष्ट्रीय जल प्राधिकारच्या बेळगावातील कार्यालयाच्या व्याप्तीमध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व आंध्र ही राज्ये येतात. त्या ठिकाणच्या भूपृष्ठ व भूजलाचे सतत संशोधन सुरू असते. त्या संदर्भात राज्य व केंद्र सरकारला अहवाल सादर केला जातो.