Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Belgaon › पाठपुरावा करूनही दुर्लक्ष, जनरेटा उभारण्याची गरज

पाठपुरावा करूनही दुर्लक्ष, जनरेटा उभारण्याची गरज

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 8:58PMसंकेश्‍वर: जितेंद्र पाटील

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे,विराप्पा मोईली यांनी कराड-कोल्हापूर-बेळगाव या  मार्गाचे औद्योगिक आणि व्यापारी महत्व पटवून दिले होते. तसेच कर्नाटकात येडियुराप्पा सरकार असताना राज्य सरकारने रेल्वे विकास प्राधिकरण समिती स्थापन केली होती. त्यावेळचे विधानसभा सभापती डी. एच. शंकरमूर्ती  समितीचे अध्यक्ष होते. तसेच तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील सदस्य होते. केंद्रात मनमोहन सिंग सरकार असताना काकासाहेब पाटील यांनी सदरच्या रेल्वेमार्गाच्या प्रश्‍नाला चांगली गती दिली होती. मात्र, अद्यापही हा प्रश्‍न निकालात निघालेला नाही. 

माजी खा. दत्ता कट्टी (चिकोडी) यांनी 25 वर्षापूर्वी पत्रव्यवहाराद्वारे या प्रश्‍नाचा पाठपुरावा केला होता. केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना रमेश कत्ती यांनीही लोकसभेत हा प्रश्‍न मांडला होता. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचाही हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न होता. 

सिद्धरामय्या सरकारने कणगला (ता. हुक्केरी) येथे 800 एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणात कणगला येत असल्याने औद्योगिक विकासासाठी याचा हातभार लागणार आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम सुरु झाल्यास राज्य सरकारने निम्मा खर्च उचलण्याचे आश्‍वासन केंद्राला दिले आहे. 

हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. रेल्वेमार्गालगत निपाणी येथील समाधीस्थळ, आडी येथील मल्लिकार्जुन देवस्थान आणि दत्त देवस्थान तसेच संकेश्‍वर, निडसोशी, अर्जुनवाड  ही धार्मिक स्थळे आहेत. तसेच गोडचिनमलकी गोकाक फॉल्स, आणि राजा लखमगोंडा हिडकल जलाशय आहे. 

रेल्वेसेवा आणि संकेश्‍वरचा जुना संबंध आहे. ब्रिटीश काळापासून संकेश्‍वरला रेल्वेचे आऊटपोस्ट ब्रिटीश रेल्वे विभागाने उभारले होते. मद्रास सदर्न मराठा रेल्वे विभाग या नावाने ते ओळखले जायचे. या आऊटपोस्टवर  अकबर काळेकाजी (संकेश्‍वर) आणि आबा हुसेन आणि कंपनी(निपाणी) या गाड्या कार्यरत होत्या. या गाड्यांच्या सहाय्याने कोकणातील तसेच चंदगड गडहिंग्लज, आजरा परिसरातील भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर वस्तूंची ने-आण करण्यासाठी ब्रिटीश कंपनीने निर्मिती केली होती. 

50 वर्षापूर्वी निपाणी पालिका प्रशासनाने रेल्वेमार्गाचा ठराव मंजूर केला होता. निपाणी येथील विष्णूपंत निंबाळकर यांनी या मार्गाच्या प्रश्‍नाला प्रथम वाचा फोडली होती. व्यापारी देवचंद शाह यांनीही या प्रश्‍नासाठी पाठपुरावा केला आहे. संकेश्‍वर नगरपालिकेमध्येही यासंबंधीचा फार जुना ठराव आहे.  आता हा प्रश्‍न धसास लावण्यासाठी परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक यांनी जनरेटा उभारण्याची गरज आहे.