Thu, Apr 25, 2019 07:24होमपेज › Belgaon › रेल्वे स्टेशनमास्टरांचे उपोषण आंदोलन

रेल्वे स्टेशनमास्टरांचे उपोषण आंदोलन

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 11 2018 11:14PMबेळगाव : प्रतिनिधी

रेल्वे स्टेशन मास्टरांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन करुन रेल्वे स्टेशनवर निदर्शने केली. दैनंदिन कामामध्ये कोणतीही कुचराई  न करता त्यांनी आपले चोवीस तासाचे आंदोलन केले. इतिहासात पहिल्यांदाच स्टेशन मास्तरांचे आंदोलन झाले. दिवसभर त्यांनी कडक उपवास पाळला. देशभरात आज आंदोलन होते. बेळगाव विभागातील 35 स्टेशन मास्तर सहभागी झाले होते.

केंद्राद्वारे मिळणारे तिसरे प्रमोशन ग्रेड पे 5400 रुपये स्टेशनमास्टरांना देण्यात यावे, देशभरात अनेक ठिकाणी स्टेशन मास्टरांना बारा तास सेवा करावी लागते. ती आणि रोस्टर पध्दत बंद करण्यात यावी.  रेल्वे गाड्यांचे नियोजन करताना स्टेशन मास्टरांना तणावाचा सामना करावा लागतो यासाठी त्यांना सुरक्षा आणि तणाव भत्ता देण्यात यावा, स्टेशन मास्टरांमधील पंधरा टक्के लोकांना राजपतीत अधिकार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, ज्या ठिकाणी रेल्वे गाड्यांची संख्या अधिक आहे, अशा स्टेशनवर सहाय्यक स्टेशनमास्टरांची नियुक्‍ती करण्यात यावी, स्टेशन मास्टर हा स्टेशनचा प्रमुख असतो. त्यामुळे त्याला इतर कर्मचार्‍यापेक्षा पगार अधिक असावा.

ज्या स्टेशनवर मुलांसाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा नाहीत अशा ठिकाणी नजीकच्या शहरामध्ये स्टेशन मास्टरांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात यावी, ड्युटी संपल्यानंतर ज्या ठिकाणी घरी जाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात यावी, स्टेशन डायरेक्टर पद हे अनुभवी स्टेशन मास्टरसाठी आरक्षित ठेवण्यात यावे,नवीन पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, स्टेशन मास्टरांची ‘ऑल इंडिया  स्टेशन मास्टर असोसिएशन’ (एआयएसएमए) संघटनेला मान्यता देण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांनी आंदोलन केले. हे आंदोलन शुक्रवारी रात्री बारापासून शनिवारी रात्री बारापर्यंत करण्यात आले.

आंदोलनामध्ये बेळगाव विभागाचे अध्यक्ष आणि बेळगाव रेल्वे स्टेशन मास्टर सुरेंद्र प्रकाश, सचिव मधुसुदन गोका, जयवंतकुमार सिंग, संतोष समदर्शी, दिलीप कुमार, रशीव कुमार, आनंद रतन मौर्य, देवानंद लाल कर्णा, अजय कुमार, गोपी रामन रॉय, अयोध्या सिंग, अभिनव कुमार, अनिल कुमार, एस. गिरीश आदी सहभागी झाले होते.