Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Belgaon › रायबागला काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता

रायबागला काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 9:33PMरायबाग : प्रतिनिधी

एससी राखीव असलेल्या रायबाग मतदारसंघात काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असून प्रत्येकजण उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. भाजपकडून विद्यमान आमदार दुर्योधन ऐहोळे यांना संधी निश्‍चित मानली जाते. 

निजद रिंगणात उतरण्यासाठी सर्व शक्ती पणाला  लावत आहे. या मतदारसंघात रायबाग तालुक्यातील गावे तसेच चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी, करोशी जि. पं. मतदारसंघातील गावांचा समावेश आहे. बहुतांश भाग दुष्काळी आहे. अनेक दशकांपासून हा मतदारसंघ राखीव आहे.

रायबागचा वाघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाटील घराण्याचा प्रभाव व वर्चस्व मोठे आहे. आजपर्यंतच्या इतिहासात घराण्याचा पाठिंबा ज्याला त्याचा विजय असे मानले जाते. पण 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन मतविभागणी झाल्यामुळे भाजप उमेदवाराला फायदा झाला. 2008 साली प्रतापराव पाटलांच्या पाठिंब्यामुळे पहिल्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार ऐहोळे यांच्याशी नंतरच्या काळात कटुता आली. 2013 च्या निवडणुकीत पाटील कुटुंबाचा विरोध झेलावा लागला होता.

काँग्रेसकडून महावीर मोहिते, सुकुमार किरणगी व प्रदीप माळगे तर निजदकडून भास्कर गगरी व भालचंद्र हंचिनाळे उमेदवारीसाठी धडपडत आहेत. मागील वेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवून तिसर्‍या क्रमांकाची मते मिळविलेले किरणगी आताही उमेदवारी मागत आहेत. पराभव होऊनदेखील जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी व जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात  सर्वसामान्यांची कामे केली आहेत. यामुळे पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी किरणगी करीत आहेत.

काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे विवेक पाटील यांच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढवून केवळ 829 मतांनी पराभूत झालेले प्रदीप माळगी यांनी यावेळी तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे. 

काँग्रेस सरकारकडून राज्य रस्ता विकास निगमचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले महावीर मोहिते इच्छुक आहेत.  खात्याचे मंत्री महादेवप्पा व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

 निजदला अस्तित्वासाठी निवडणूक लढावी लागणार असून प्रभाकर गगरी व भालचंद्र हंचिनाळे उमेदवारीसाठी बंगळूरची वारी करीत आहेत. तिघे कंत्राटदार विद्यमान  आ. ऐहोळे पूर्वी कंत्राटदार होते. इच्छुक महावीर मोहिते, माळगीही कंत्रादटार असल्यामुळे निवडणुकीत कंत्राटदार एकमेकासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.