होमपेज › Belgaon › राहुल गांधी आजपासून उत्तर कर्नाटक दौर्‍यावर 

राहुल गांधी आजपासून उत्तर कर्नाटक दौर्‍यावर 

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 1:15AMबेळगाव : प्रतिनिधी 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उद्या (शनिवार) पासून उत्तर कर्नाटकाच्या दौर्‍यावर येत आहेत. बेळगाव, विजापूर, बागलकोट, हुबळी या चार जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा आणि कोपरा सभा होणार आहेत. पहिल्यांदाच त्यांचा उत्तर कर्नाटकात तीन दिवसांचा दौरा असेल. 

24 रोजी बेळगाव जिल्ह्यातील अथणी व त्यानंतर रविवारी (दि. 25) विजापूर, बागलकोट व सोमवारी (दि.26) बागलकोट, बेळगाव, हुबळी या ठिकाणी राहुल गांधी यांचे जाहीर कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी (दि. 24) सकाळी 11.30 वा. त्यांचे सांबरा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरमधून अथणीला जातील. सभा घेतल्यानंतर करिमसुती येथे 1 वा. स्त्रीशक्ती कार्यक्रमात भाग घेऊन विजापूरला प्रयाण करतील. रविवार दि.25 रोजी विजापूर जिल्ह्यातील चिक्कपडसलगी, जमखंडी, मुळवाड, बागलकोट जिल्ह्यातील बिळगी, मुधोळ आणि बागलकोट येथे सभा घेणार आहेत. 

सोमवार 26 रोजी बागलकोट व त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथील चिंचोळी येथे 12 वा. सभा 1 वा.सौंदत्ती येथे सभा. त्यानंतर धारवाडला प्रयाण करणार आहेत. धारवाडमध्ये ते गदग, हावेरी आणि कारवार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून नवी दिल्लीला प्रयाण करतील.

अथणीत बंदोबस्तासाठी 1100 पोलिस तैनात

अथणी : वार्ताहर         

जनाशीर्वाद मेळाव्याच्या निमित्ताने अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आज शनिवारी येथे आगमन होत आहे. हुडको कॉलनीतील मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. शांतता?सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या विविध पोलिस स्थानकांतून येथे दाखल झालेल्या पोलिसांची हजेरी मंडल पोलिस निरीक्षक एच.राजशेखर यांनी घेतली. बंदोबस्तासाठी 1100 पोलिस नेमण्यात आले आहेत. यामध्ये 5 डीएसपी, 11 सीपीआय, 27 पीएसआय, 80 एएसआय, 169 सिव्हिल हेडकॉन्स्टेबल, 303 सिव्हिल पोलिस कॉन्स्टेबल, एक महिला हेड कॉन्स्टेबल, 55 महिला कॉन्स्टेबल, 288 होमगार्ड, 50 केएसआरपी/डीएआर, 15 बाँंब निष्क्रिय दल, 15 श्वानपथके याप्रमाणे  कर्मचारी तैनात केले असल्याचे  राजशेखर यांनी सांगितले. 

जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी, पोलिस उपअधीक्षक रामगौडा पाटील, पोलिस उपनिरीक्षक बी. सुरेश तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

शहरात खाकीच खाकी

बंदोबस्तासाठी शहरात नेमण्यात आलेल्या पोलिसांमुळे सर्वत्र खाकीच खाकी दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या सभेला विविध भागातून  सुमारे 5 लाख कार्यकर्ते येतील, असे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी सांगितले.

अथणीबरोबरच रायबाग, ऐनापूर, कागवाड, बेळगाव, विजापूर, महाराष्ट्रातून कोल्हापूर, जत, मिरज, सांगली आदी भागातून कार्यकर्ते येणार असल्याचे ते म्हणाले.