Tue, Mar 26, 2019 12:22होमपेज › Belgaon › चीनशी स्पर्धा करण्यासाठी रोजगार निर्मितीची गरज

चीनशी स्पर्धा करण्यासाठी रोजगार निर्मितीची गरज

Published On: Apr 08 2018 8:36PM | Last Updated: Apr 08 2018 8:41PMबंगळुरू : वृत्तसंस्था

आगामी 30 वर्षे भारताला सर्वच क्षेत्रात चीनशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यासाठी रोजगार निर्मितीत वाढ केली, तरच केंद्र सरकार या देशातील तरुणांच्या मनात विश्‍वास निर्माण करू शकेल, असे मत राहुल गांधी यांनी येथे व्यक्‍त केले. त्यांनी रविवारी कर्नाटकातील उद्योजकांशी संवाद साधला.

राहुल म्हणाले, चीनशी स्पर्धेला तोंड देण्यासाठी मानसिकतेतही बदल करण्याची गरज आहे. हरित क्रांती व दूरसंचार क्रांतीची उदाहरणे सध्याच्या सरकारसमोर आहेत. देशाच्या विकासात लघुउद्योगांचा मोठा वाटा आहे. तरुणांसाठी रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. मोठ्या व लहान उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण व आराखडा हवा, असेही राहुल गांधी यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. काँग्रेस येत्या काही दिवसांत पक्षाचा राष्ट्रीय जाहीरनामा घोषित करणार आहे. त्यासाठी पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

जीएसटीचा फेरआढावा घेणार

भाजप सरकार राबवित असलेल्या जीएसटी मसुद्याशी काँग्रेस सहमत नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. भारतातील सध्याची जीएसटी कररचना जगातील सर्वात गुंतागुंतीची आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास सध्याच्या जीएसटीचा फेरआढावा घेऊन त्याची पुनर्रचना करू, असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले.

सफाई कामगारांसाठी कर्नाटक मॉडेल राबविणार 

कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या जनाशीर्वाद यात्रेच्या सहाव्या टप्प्यात राज्याच्या दौर्‍यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सफाई कामगार व महिलांशीही संवाद साधला. सिद्धरामय्या सरकारने सफाई कामगारांच्या कल्याणासाठी राबविलेल्या धोरणाचे त्यांनी कौतुक केले. काँग्रेस सत्तेवर आल्यास सफाई कामगारांच्या कल्याणाचे कर्नाटक मॉडेल देशात राबवू, असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले. कर्नाटकने सफाईतील ठेकेदारी पद्धत संपुष्टात आणली आहे. त्याऐवजी सफाई कामगारांना सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांना 7,500 वरून 18,000 पर्यंत वेतनवाढ देण्यात आली आहे.