Wed, Oct 16, 2019 19:47होमपेज › Belgaon › आरटीओ सर्कल ‘डेंजर झोन’

आरटीओ सर्कल ‘डेंजर झोन’

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:18AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

विस्तारणार्‍या शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणे धोकादायक बनत आहेत.  आरटीओ सर्कल डेंजर झोन होत आहे. या चौकात चारी बाजूने  येणारी वाहने व सततची वर्दळ यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. 

शहरात अनेक अपघातप्रवण ठिकाणे आहेत. यामध्ये आरटीओ कार्यालयाशेजारी हा चौक अपघातांना कायमच निमंत्रण देत असतोे. धोकादायक वळणे आहेत. अचनाक लागणारे वळण वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनले आहे. येथे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. सुरक्षित वाहतुकीच्या संदर्भात कोणत्याच उपाययोजना नसल्याने हे वळण दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. काळानुसार वाहनांची वाढती संख्या व वेग पाहता चालकांच्या सुरक्षेची दक्षता व सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित विभागाचे कर्तव्य आहे. भविष्यकाळातील धोका टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय झाले तर मनुष्यहानी टाळता येईल. 

चौक डेंजर झोन बनल्याने अनेकांना प्रवास करताना समस्या येतात. यापूर्वी शहरातील मुख्य चौक समजले जाणारे किल्ला येथील अशोक चौक, चन्नमा चौक येथे अपघात झालेले आहेत. याची दक्षता घेऊन वाहतूक पोलिसांनी उपाययोजना आखाव्यात. आरटीओ सर्कलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, किल्ला तलाव व मुख्य बसस्थानकाकडून एकदाच वाहने येतात. सिग्नल व गतिरोधक नसल्याने अनेक वेळा वाहतुकीची समस्या निर्माण होते. अपघाताचे धोकेही संभवतात.