Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Belgaon › आरटीईसाठी चार वर्षांत 35 कोटी खर्च

आरटीईसाठी चार वर्षांत 35 कोटी खर्च

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 14 2018 12:54AMबेळगाव : प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 2014 ते 2018 पर्यंत 9,434 विद्यार्थ्यांनी पहिली ते एलकेजी वर्गासाठी खासगी शाळांतून प्रवेश घेतला. यासाठी शिक्षण खात्याने 35 कोटी 29 लाख 37 हजार 501 रुपये खर्च केले आहेत. यंदाचा निधी अजून जमा झालेला नाही. 

बेळगाव जिल्ह्यातील 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के जागा शाळांतून भरण्यात येत आहेत. जिल्ह्यासाठी 4105 जागा भरण्यात येणार होत्या. पहिल्या फेरीत  2634 जागा, दुसर्‍या फेरीत 203 व तिसर्‍या फेरीत 576 जगा भरण्यात आल्या होत्या. मात्र यापैकी 3,413 जागा भरण्यात आल्या आहेत. पहिली व एलकेजी वर्गासाठी खासगी शाळांतून जागा भरण्यात येत आहेत. यंदा काही अनुदानित शाळांतूनही जागा भरण्यात आल्या आहेत. 

गरीब, दुर्बल घटकांतील मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे. त्यांना मोफत शिकविण्यासाठी खासगी, अनुदानित शाळांतून 25 टक्के जागा भरण्यात येत आहेत. सरकारच त्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 2012 पासून आरटीई अंतर्गत जागा भरण्यास सुरूवात करण्यात  आली आहे. आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना संबंधित प्रभागात  शाळेतच दाखल करावे लागणार आहे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड वरील पत्त्यावरच शाळेत दाखल करून घेतले जात आहे. 

ऑनलाईन अर्ज संख्येत वाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सरकारने गत तीन वर्षात राज्यातील खासगी शाळांसाठी 823 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक वर्षी आरटीईसाठी ऑनलाईन अर्जांच्या संख्येत वाढ होत आहे. अर्जांच्या संख्येत वाढ झाल्याने लॉटरी पद्धतीने शाळेत प्रवेश दिला जात आहे, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एन. महेश यांनी विधान परिषदेत सांगितले.