Tue, Mar 26, 2019 07:46होमपेज › Belgaon › आरएसएस  हा  रिमोट  कंट्रोल

आरएसएस  हा  रिमोट  कंट्रोल

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:40AMगुलबर्गा : वार्ताहर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) केंद्र सरकारच्या धोरणांचा निरीक्षक म्हणून कार्य करीत असून केंद्र सरकारच्या प्रत्येक खात्यात आरएसएसचा संचालक असल्याची टीका काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. 

येथील पीडीए इंजिनियरिंग कॉलेजच्या सभागृहात मंगळवारी उद्योजक आणि तंत्रज्ञाशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. एका प्रश्‍नावर उत्तर देताना ते म्हणाले, केंद्रीय अधिकारी कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचे मत घेत नाहीत. ते आरएसएसचे सदस्य सांगतील त्याप्रमाणे काम करतात अन् हा प्रकार केंद्र शासनाच्या सर्व खात्यात सुरू आहे. 

राहुल पुढे म्हणाले, नोटाबंदीची शिफारस अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या खात्याची नव्हती. आरएसएस सदस्यांनी सूचना केली, म्हणून नोटाबंदी पंतप्रधानांनी अमलात आणली. ही योजना काळा पैसा पांढरा करण्यासाठी होती. जीएसटी म्हणजे ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे नमूद करून राहुल म्हणाले की, ही अत्यंत गुंतागुंतीची कर योजना असून व्यापारी ही योजना समजून घेण्यासाठी धडपडत आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्याबरोबर आम्ही जीएसटी योजना सोपी आणि सुटसुटीत करून कररचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल म्हणाले की, या धोरणामुळे रशिया आणि इतर भारताची मित्रराष्ट्रे भारतापासून दूर जात आहेत. त्यामुळे भारत आशिया खंडात एकाकी बनला आहे. 

कर्नाटकात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने  विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची मागील साडेचार वर्षांत पूर्तता केली असून, सरकार कशी चालवावी आणि विकासकामे कशी करावीत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून शिकायला हवे, असेही राहुल जेवरगी आणि आळंद येथील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत म्हणाले.  काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जी परमेश्‍वर, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रभारी वेणुगोपाल, बी. के. हरिप्रसाद, खर्गे, डॉ. शरणप्रकाश पाटील, डी.के. शिवकुमार,आमदार डॉ. अजयसिंग, आ. बी. आर. पाटील(आळंद), डॉ. उमेश जाधव (चिंचोळी)आदी उपस्थित होते.