Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Belgaon › शंभर रु. बाँडवरील घरे पाडू नका

शंभर रु. बाँडवरील घरे पाडू नका

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील 10 आणि 100 रुपयाच्या स्टँपवर खरेदी केलेली घरे पाडण्याचा इशारा विभागीय आयुक्तांनी दिला आहे. यामुळे नागरिक अडचणीत सापडणार आहेत. यासाठी हा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी मराठी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

उपरोक्त मागणीचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.  शहरातील बहुतांश नागरिकांकडून 10 व शंभर रुपयाच्या स्टँपवर जागा खरेदी करण्यात आली आहे. त्यांनी बुडाकडून कोणतीही मंजुरी न घेता घरे उभारली आहेत. यासाठी त्यांनी आयुष्यभराची पुंजी गुंतवली आहे. हे नागरिक गरजू व अशिक्षित आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान नाही. यामुळे त्यांच्याकडून असे प्रकार घडले आहेत. 

शहरासह आसपासच्या परिसरात जास्तीत जास्त घरे बाँडवर खरेदी करून बांधण्यात आली आहेत. अशा अनेक कॉलन्या उदयास आल्या आहेत. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, वीज सुविधा देण्यात आल्या आहेत. रहिवाशांकडून मनपाला मालमत्ता करही भरला जातो. सर्व प्रकारचे कर भरून घरे अधिकृत करण्यात आली आहेत.  प्रादेशिक आयुक्तांच्या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गरीब नागरिकांनी कष्टाच्या पैशातून जागा घेऊन घरे बांधली आहेत. यासाठी त्यांच्यावर कसलीच कारवाई करू  नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी नगरसेवक विनायक गुंजटकर, रेणू मुतकेकर, अनिल मुचंडीकर, रूपा नेसरकर, एम. एस. चिगरे, सुधा भातकांडे, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, किरण सायनाक, नगरसेवक मोहन बेळगुंदकर, सरिता पाटील, संजय शिंदे, रतन मासेकर,  यांच्यासह नेताजी जाधव, नारायण किटवाडकर, नारायण सावंत, किरण गावडे आदी उपस्थित होते.

 

Tags : belgaon, belgaon news, house, stamp, dont demolish,