होमपेज › Belgaon › मनमानी अधिकार्‍यांना आवरणार कोण ?

मनमानी अधिकार्‍यांना आवरणार कोण ?

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 04 2017 9:56PM

बुकमार्क करा

खानापूर : विलास कवठणकर

खानापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी शासनाच्या सर्व खात्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांचा या सर्व कार्यालयांशी संबंध योतो. मात्र, अद्यापही अनेक सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या एकाही सेवेची माहिती नाही. त्यामुळे त्यांना अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. त्यातच अलिकडच्या चार वर्षात  अधिकार्‍यांकडून सामान्यांची पिळवणूक वाढली असून एजंटराज निर्माण झाले आहे. 

तालुका लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ट अधिकार्‍यांचे यावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांनी कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तहसीलदार, पोलिस स्थानक, ता. पं., हेस्कॉम, सार्व. बांधकामसह सर्वच खात्याच्या अधिकार्‍यांची मनमानी वाढल्याने सामान्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. कोणत्याही कार्यालयामध्ये एखाद्या कामासाठी गेले असता अधिकार्‍यांकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसून उलट अनेकप्रकारे नाहक त्रास दिला जातो. 

तहसीलदार आणि पोलिस स्थानकाच्या कारभारामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. तहसीलमध्ये एकही काम वेळेत होत नाही. त्यात एजंटांना पुढे केले जाते. त्यांच्याकडून अमूक या अधिकार्‍यांना एवढे द्यायचे आहेत म्हणून पैसे उकळले जातात. तर पोलिस स्थानकात कोणत्याही प्रकरणाचा पंचनामा वेळेत होत नाही. उलट खर्‍या तक्रारदारांवरच अन्याय केला जात असून त्यासाठी अर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. 

ग्रामीण पातळीवरील विकासाची भूमिका निभावणार्‍या ता.पं. ला तर भ्रष्टाचाराची किड लागली आहे. ग्रामपंचायतीमधील समस्या घेवून आलेल्या नागरिकांच्या एकाही समस्येचा पाठपुरावा होत नाही.कणकुंबी, गोल्याळी, निलावडेसह तालुक्यातील अनेक पंचायतींमध्ये लाखोंचा घोटाळा झालेला असताना ता. पं. अधिकार्‍यांकडून याकडे डोळेझाकपणा करण्यात येत आहे. शिवाय माहिती अधिकारांतर्गत मांडलेल्या एकाही समस्येचा पाठपुरावा होत नाही. हेस्कॉमध्येही असेच चालले असून गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या अक्रम-सक्रम योजनेसह वीजपंप, नवीन वीजसेवा जोडणीमध्ये कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करुनही याची वरिष्ठांकडून दखल घेतली जात नाही.