Wed, Jul 17, 2019 20:37होमपेज › Belgaon › हत्येचे पुरावेही बेळगावात

हत्येचे पुरावेही बेळगावात

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 1:03AMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करून मारेकर्‍यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली मारुती ओमनी कार एसआयटीने बेळगावातून जप्त केली आहे, तर दुचाकीचा शोध सुरू आहे. दुचाकी महाराष्ट्रात नोंदणी झालेली आहे, तर ओमनी बेळगावची आहे, असे एसआयटीचे म्हणणे आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मारेकर्‍यांना आश्रय दिल्याप्रकरणी व खानापूर तालुक्यातील चिखले येथील आपल्या फार्महाऊसमध्ये बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यास मदत केल्यावरून भरत कुरणेला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीनंतर एसआयटीला आता बेळगावात पुरावेही सापडू लागले आहेत.

गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळूर येथे हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर शूटर परशुराम वाघमारे आणि अमित बद्दी दुचाकीवरून पळून गेले. बंगळूरमधील कुंबलगुंडा परिसरात भरत कुरणे हा ओमनी कारमध्ये त्यांची वाटच पहात होता. सदर कारमध्ये परशुराम वाघमारेने आपले कपडे व बूट बदलले तसेच हेल्मेट कारमध्ये ठेवले आणि ते कुंबलगुडा येथून मोहन नाईक यांच्या अ‍ॅक्युपंक्‍चर क्‍लिनीकला गेले. 

या प्रवासासाठी वापरण्यात आलेली ओमनी कार एसआयटी पोलिसांनी बेळगावातून जप्त केली. तीन दिवसांपूर्वीच ती जप्त करण्यात आली असल्याची शक्यता आहे. ती कार कुणाच्या मालकीची हा उलगडा झालेला नाही. मात्र ती भरत कुरणेची असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

तर गौरी यांच्या घरापासून कुंबलगुंडापर्यंत पलायानासाठी वापरलेली दुचाकी दुचाकी महाराष्ट्रातील असून  एसआयटीने  तिचा शोधा जारी ठेवला आहे.  एसआयटी पोलिसांच्या सूत्रांनुसार मिळविण्यात आलेली कार याच भागातील असल्याने दुचाकीही याच परिसरातील असल्याचा संशय व्यक्त केला आहे.पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्रात नोंदणी झालेली दुचाकी वापरण्यात आली असावी, असा अंदाज आहे.

चिखलेत 6 संशयित

गौरी लंकेश हत्येशी संबंधित असणारे तब्बल 6 संशयित भरत कुरणेच्या चिखले येथील रिसॉर्टवर होते. त्यात मुख्य सूत्रधार अमोल काळेही होता, अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे. दरम्यान, कटाचा मुख्य सूत्रधार अमोल काळे हा महाराष्ट्रातील असल्याने गौरी लंकेश यांच्या हत्येदरम्यान वापरण्यात आलेली दुचाकी ही महाराष्ट्रातील असल्याचा संशय एसआयटी पथकाने व्यक्‍त केला आहे.