Mon, Jun 17, 2019 04:12होमपेज › Belgaon › म.ए.समिती कार्यकर्त्यांवरील  दोषारोप निश्‍चिती लांबणीवर

म.ए.समिती कार्यकर्त्यांवरील  दोषारोप निश्‍चिती लांबणीवर

Published On: May 06 2018 1:07AM | Last Updated: May 06 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक काढल्यानंतर म. ए. समिती कार्यकर्त्यांनी त्याच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र राज्य उचगाव’ असा फलक लावला होता. त्याबद्दल काकती (ता. बेळगाव)पोलिसांनी समितीच्या 8 कार्यकर्त्यांवर दोन समाजात भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 ‘ए’ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी व केपीडीपी कायदा कलम 2 ‘ए’ नुसार गुन्हा नोंद करून खटला दाखल केलो. त्या खटल्यात शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयामध्ये दोषारोप निश्‍चिती करण्यात येणार होती. परंतु आठपैकी एक कार्यकर्ता गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोषारोप निश्‍चिती 25 मे पर्यंत पुढे ढकलली.

दोषारोप निश्‍चितीसाठी आरोप असलेले सर्व संशयित उपस्थित राहिले पाहिजेत. अन्यथा दोषारोप निश्‍चिती स्थगित केली जाते.  कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य फलक काढल्यानंतर त्या घटनेचा निषेध करून कार्यकर्त्यांनी उचगाव येथे महाराष्ट्र राज्य फलक लावला होता. या प्रकरणी काकती पोलिसांनी मनोहर होनगेकर, अरुण जाधव, विवेक गिरी, नितीन जाधव, अनंत देसाई, संतोष पाटील, गणपत पाटील व भास्कर कदम या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. खटल्याचे कामकाज अ‍ॅड. महेश बिर्जे पाहत आहेत.