होमपेज › Belgaon › बंडखोरावर फेकले पाणी 

बंडखोरावर फेकले पाणी 

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:51AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बंडखोर उमेदवार मोहन बेळगुंदकर सोमवारी मुतगे येथे प्रचारासाठी गेले असताना  त्यांना ग्रामस्थांनी प्रचार करण्यास मज्जाव करून अंगावर पाणी फेकून माघारी धाडले.म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याने संतप्त बनलेल्या कार्यकर्त्यांनी बेळगुंदकर यांंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी  केली.

बेळगुंदकर हे पूर्व भागात प्रचार करणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचार करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला होता. सकाळच्या सत्रात निलजी येथील कार्यकर्त्यांनी त्यांची वाट पाहिली. मात्र, तेथे ते उशिरा गेले. त्यानंतर त्यांनी मुतगा येथे प्रचाराला सुरुवात केली. ही माहिती कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी मुतगे येथे धाव घेऊन त्यांनी बेळगुंदकर यांना गराडा घातला. तसेच त्यांच्यावर प्रश्‍नाची सरबती करण्यात आली. 

संतप्त बनलेले कार्यकर्ते म्हणाले, मुतगा गावातील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गावात शनिवारी प्रचार केलेला आहे. त्यामुळे बंडखोरांना गावात प्रवेश देण्यात येणार नसून प्रचाराविना माघारी फिरावे, असे आवाहन केले.

परंतु, बेळगुंदकर यांनी प्रचार थांबविण्यास नकार दिला. यामुळे कार्यकर्त्यांनी बेळगुंदकर  व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पाणी ओतून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगुंदकरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांची गावातून हकालपट्टी करण्यात आली. काही दिवसापासून बंडखोराविरोधात सीमाभागात असंतोषाची लाट पसरत चालली आहे. ठिकठिकाणी बंडखोरांना प्रचार करण्यापासून रोखण्यात येत आहे. उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. यामुळे बंडखोर उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.