Thu, Apr 25, 2019 11:46होमपेज › Belgaon › सरांची ‘छडी’ ठरणार का निपाणीत निर्णायक?

सरांची ‘छडी’ ठरणार का निपाणीत निर्णायक?

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 08 2018 12:12AMबेळगाव : प्रतिनिधी

परिवर्तनवादी चळवळीची, पुरोगामी विचाराची पार्श्‍वभूमी लाभलेल्या निपाणी मतदारसंघात भाजपच्या उजव्या विचाराचे कमळ मागील विधानसभा निवडणुकीपासून उमलले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेसचा  विजय प्रा. सुभाष जोशी यांच्या निर्णयावर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे जोशींच्या निर्णयाकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

निपाणी भाग एकेकाळी सीमाचळवळीचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात असे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा तालुक्याला भिडल्यामुळे मराठीचा  ठसा या भागावर आहे. परंतु, चळवळीतील नेत्यांच्या कोलांंटउड्यामुळे राजकीय पक्षांनी याठिकाणी चांगलेच बस्तान बसविले असून म. ए. समितीचे अस्तित्व शोधावे लागण्याइतपत ते विखुरले गेले आहे. 

निपाणी शहर एकेकाळी परिवर्तन चळवळीचे माहेरघर मानले जात असे. महाराष्ट्रात झालेल्या अनेक विधायक चळवळींना बळ पुरविण्याचे काम या भागाने केलेे. परंंतु, काळाच्या ओघात चळवळी गायब झाल्या. 

भाजपच्या आ. शशिकला ज्वोल्ले यांनी काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांना 2013 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत केले. या विजयात  माजी आ. सुभाष जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. आगामी विधानसभा निवडणुकीतही प्रा. जोशी यांच्या भूमिकेला महत्त्व आहे आहे.

मागील निवडणुकीत भाजपची पाठराखण केलेल्या प्रा. जोशी यांचे आ. जोल्ले यांच्याशी असणारे सख्य वादात सापडले आहे. त्यांनी मागील काही दिवसापासून माजी आ. काकासाहेब पाटील यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामुळे त्यांचा कल काँग्रेसकडे दिसून येत आहे. त्यांच्या निर्णयाकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपतर्फे जोल्ले

निपाणी मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपतर्फे आ. शशिकला जोल्ले यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

काँग्रेसमध्ये इच्छुक अधिक

काँग्रेसतर्फे सध्या माजी आ. काकासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, लक्ष्मण चिंगळे, उत्तम पाटील, निपाणी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत.

उत्सुकता जोशींच्या निर्णयाची

प्रा. जोशी जनता दलातून आमदार झाले होते. ते चळवळीतील नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकर्त्यांचा गट कार्यरत आहे. यामुळे जोशी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की एखाद्या पक्षाच्या पाठीमागे ताकद उभी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यावरच उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.  

म. ए. समिती

महाराष्ट्र एकीकरण समिती काय करणार, याकडेही राष्ट्रीय पक्षांचे लक्ष आहे. काकासाहेब हे एकेकाळचे समितीचे खंदे नेते. पण नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आमदारही झाले. पण गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा समिती उमेदवार उभा करणार की कसे, हा निर्णय झालेला नाही. शिवसेना आणि समितीने एकत्र येऊन एक उमेदवार द्यावा, असा सूर कार्यकर्त्यांचा आहे.

Tags : Belgaum, Belgaum news, Subhash Joshi, Decision, Probability,