Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Belgaon › कुद्रेमानीजवळ जुगारी अड्ड्यावर छापा 

कुद्रेमानीजवळ जुगारी अड्ड्यावर छापा 

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:50AMबेळगाव : प्रतिनिधी

कुद्रेमानी फाट्यापासून काही अंतरावर असणार्‍या फार्महाऊसमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 40 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. तसेच सव्वा चार लाख रुपये, 5 कार, 44 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या. बुधवारी सायंकाळी पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यामुळे जुगार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरासह परिसरात अवैध धंद्यांना उत आला आहे. यावरून वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्थानिक पोलिस अधिकार्‍यांची झाडाझडती घेतल्यानंतर कारवाईला वेग आला आहे. शिवाय, ‘पुढारी’ने गेल्या महिन्यात या जुगार अड्ड्याबद्दलची बातमी छापून पोलिस प्रशासनाला जागृत केले होते. बेळगाव शहरात  पोलिस आयुक्‍तालय स्थापन करण्यात आल्यानंतर जुगारी अड्ड्यांवर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

कुद्रेमानी फाट्यापासून जवळ शेतवडीत गुळाचा कारखाना सुरू करण्यात आला होता. तो कारखाना बंद पडल्यानंतर त्या शेतात काजू बागायत व उसाचे पीक घेण्यात येते. महाराष्ट्राची सीमा येथून केवळ 50 फुटांवर आहे. याचा फायदा घेऊन जुगार्‍यांनी गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. 

मुख्य रस्त्यापासून एक हजार फुटाच्या अंतरावर असणार्‍या बागेत बंद अवस्थेत असलेल्या गोदामात बेळगाव परिसरातील काही धनधांगडग्यांनी हा धंदा थाटला होता.उपायुक्‍त लाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस पथकाने बुधवारी सायंकाळी गुपचूप रिक्षांमधून जाऊन अड्ड्यावर छापा टाकला. जुगार्‍यांना संशय येऊ नये, यासाठी पोलिस आपल्या नेहमीच्या पोलिस वाहनांतून गेले नाहीत. अचानक पडलेल्या छाप्यामुळे सैरभैर झालेल्या जुगार्‍यांनी पलायनाचा प्रयत्न केला. त्यात सुमारे 30 जण पळूनही गेले, तर 40 जण पोलिसांच्या हाती लागले. अनेकानी पायातील चप्पल टाकून पोबारा केला. 

वाहने सोडून पलायन

घटनास्थळावरच दुचाकी आणि चारचारीही सोडून अनेकांनी पलायन केले. अशा 5 कार आणि 44 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली आहे. रात्री उशीरापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

सदर भाग कुद्रेमानी ग्रामपंचायतीच्या व्याप्‍तीत येत असल्याने कुद्रेमानी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर ग्राम पंचायत सदस्यांनी जुगार अड्डाचालकांना समज दिली होती. मात्र ‘कुणाकडेही तक्रार करा, आमचं कोणीच काही वाकडं करु शकणार नाही’ असा उद्दामपणा अड्डेमालकांनी दाखवला होता. जुगार अड्ड्याची काकती पोलिसांनी माहिती होऊनही त्यांनी काहीच कारवाई केली नव्हती. मात्र उपायुक्तांनी पुढाकार घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.