Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Belgaon › गरिबांच्या ‘नाचणी’ला मिळतेय प्रतिष्ठा

गरिबांच्या ‘नाचणी’ला मिळतेय प्रतिष्ठा

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 01 2018 7:41PMबेळगाव : प्रतिनिधी

एकेकाळी गरिबांचे खाद्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाचणीला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. यामुळे लागवड क्षेत्रात तब्बल दुप्पट वाढ झाली असून नाचणीला मागणी वाढत आहे. बदलत्या शैलीमुळे नाचण्याचा आहारात वापर वाढला आहे. 

जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील पश्‍चिम भागात प्रामुख्याने नाचणा पीक घेण्यात येते. यावर्षी कृषी खात्याने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट क्षेत्रात नाचण्याची लागवड झाली आहे. मागणी कमी असल्यामुळे अन्य पिकाकडे वळलेला शेतकरी पुन्हा एकदा नाचण्याकडे वळला आहे. 

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक व्याधीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मधुमेह सारख्या रोगाचा समावेश आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टराकडून नाचणीचा वापर करण्याची सूचना रुग्णांना करण्यात येते. यामुळे शहराबरोबर खेड्यापाड्यातीलही नागरिकांकडूनही नाचणीची मागणी वाढली आहे.

गरिबांचे खाद्य म्हणून एकेकाळी नाचणीची हेटाळणी करण्यात येत असे. परंतु काळाच्या ओघात नाचणीला अच्छे दिन आले असून कवडीमोल किमतींने विकल्या जाणार्‍या नाचणीचा दर वाढला आहे. यामुळे शेतकर्‍याकडून नाचणी क्षेत्रात वाढ करण्यात आलेली आहे.हे पीक प्रामुख्याने हलक्या आणि वरकस जमिनीत घेतात. यासाठी उष्ण हवामान आवश्यक असते. पिकासाठी अधिक आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही. यामुळे शेतकर्‍याकडून नाचणी पिकाला प्राधान्य देण्यात येते.

औषधी गुणधर्म

हे पीक तृणधान्यामध्ये येते. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजले जाते. यामध्ये कॅल्शियमबरोबर लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही पोषकद्रव्य असतात. हे पीक शक्तीदायक आहे.  यात 6 ते 11 टक्के प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स्फुरद असते. मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. यामुळे रक्तातील कोलेस्टेटरॉल कमी होते तसेच मधुमेहाचे प्रमाण कमी होते.

क्षेत्रात लक्षणीय वाढ

जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागात अधिक प्रमाणात घेण्यात येते. बेळगाव तालुक्यात 300 हेक्टर क्षेत्रात नाचणा लागवडीचे क्षेत्र निश्‍चित केले  होते. प्रत्यक्षात 613 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. खानापूर तालुक्यात कृषी खात्याने 150 हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात 189 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

नाचण्याचा वापर

नाचणा प्रामुख्याने भाकरीसाठी वापरला जातो. त्याचबरोबर आंबील करून पिण्यात येते. सध्या नाचणी हे पौष्टिक पीक म्हणून ओळखले जाते. नूडल्स, माल्ट, नुडल्स, पापड, इडलीही बनवितात. लहान मुलांना सत्त्व काढून विक्री करण्यात येत आहे.

या भागात होते लागवड

बेळगाव तालुका : बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, बाकमूर, बडस, किणये, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, राकसकोप, यळेबैल, कुद्रेमानी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, कोनेवाडी, बसुर्ते, उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड.

खानापूर तालुका : जांबोटी, बैलूर, देवाचीहट्टी, ओलमणी, कालमणी, कणकुंबी, उचवडे, कोलिक, गोल्याळी, लोंढा, वडगाव आदी परिसर.