Mon, May 27, 2019 01:09होमपेज › Belgaon › राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने

राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने

Published On: Sep 05 2018 2:12AM | Last Updated: Sep 04 2018 11:02PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक लॉ सोसायटीच्या  आर. एल. लॉ कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्त 15 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेळगावात येत असून, भूमार्गापेक्षा हेलिकॉप्टरने त्यांना कार्यक्रम स्थळी नेण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मच्छे येथे हेलिपॅड उभारून तेथून मोटारीने कार्यक्रमस्थळी नेण्यात येईल. 

राष्ट्रपती दौर्‍याच्या तयारीसाठी प्रादेशिक आयुक्‍त पी. ए. मेघण्णावर यांच्या कार्यालयात मंगळवारी अधिकार्‍यांची बैठक झाली. कोणत्याही कारणास्तव शिष्टाचाराचा भंग करू नये, अशी सूचना मेघण्णावरांनी दिली. 

राष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्री, अ‍ॅटर्नी जनरल यांच्यासह बारापेक्षा अधिक अतिमहनीय व्यक्‍तींचे आगमन होणार आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ करू नये. अधिकार्‍यांनी परस्पर समन्वय साधावा. सांबरा विमानतळावर आगमन झाल्यावर विश्रामधाममार्गे कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी सुमारे 24 किमी प्रवास करावा लागणार आहे. या मार्गावरील गतिरोधक काढणे, रस्ता दुरूस्ती करणे, स्वच्छता यासह विविध कामे हाती घेण्याची सूचना मेघण्णावर यांनी दिली.

भू-मार्गाने जाण्याऐवजी हेलिकॉप्टरचा पर्याय उपलब्ध आहे. तशी माहिती शिष्टाचार विभागाला कळविण्यात आली आहे. लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी झियाउल्‍ला एस. यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केल्याचे सांगितले. या मार्गावरील सोयी व इतर माहितीचा अहवाल राज्य शिष्टाचार विभागाला पाठविला जाईल. तेथून तो राष्ट्रपती भवनाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्‍चित केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.