Fri, Jul 19, 2019 05:50होमपेज › Belgaon › शांती, अहिंसा, त्याग हीच बाहुबली यांची शिकवण

शांती, अहिंसा, त्याग हीच बाहुबली यांची शिकवण

Published On: Feb 08 2018 1:43AM | Last Updated: Feb 07 2018 10:40PMश्रवणबेळगोळ : सुनील पाटील

शांती, अहिंसा, त्याग हे विश्‍वकल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत. त्यामुळेच श्री गोमटेश्‍वर बाहुबली भगवंतांनी सर्वसंगपरित्याग करून तपश्‍चर्येचा मार्ग अवलंबिला. संघर्षाने शांती मिळत नाही, हे भगवान श्री बाहुबली यांनी राजत्यागातून सांगितले, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. श्रवणबेळगोळ (जि. हसन) येथील महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे कृषिमंत्री ए. मंजू, डॉ. वीरेंद्र हेगडे उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, येथे आल्यानंतर एक प्रेरणाशक्‍ती मिळते.  चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्‍त मौर्य यांनी सल्लेखना घेतली व तपश्‍चर्येतून जीवन त्याग केला. आजचा होणारा महोत्सव हा जैन धर्मीयांचा कुंभमेळा आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या सर्वांनी भगवान बाहुबली यांच्या विचारांचा संदेश, त्यांनी सांगितलेली  मूल्ये, त्याग, अहिंसा यांचा संदेश येथून घेऊन जावा आणि अंगिकारावा. डॉ. वीरेंद्र हेगडे म्हणाले, अंत:करणातील अंध:कार भगवान बाहुबलींच्या संदेशाने दूर व्हावा, अशी प्रार्थना जैन धर्मीय सकाळी उठल्यानंतर  करतात. ही प्रार्थना ते केवळ स्वत:साठी न करता संपूर्ण विश्‍वासाठी करतात. राज्यपाल वाला म्हणाले, सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सिद्धांतांचा अवलंब करून जीवनाचे सार्थक करावे. खर्‍या सिद्धांताने आपल्या जीवनात अर्थ  येईल.प. पू. स्वतीश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी या महोत्सवासाठी मोठे योगदान दिले आहे. महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे. यावेळी आचार्य वर्धमान सागर महाराज यांचे आशीर्वचन झाले. विविध वाद्यांच्या गजरात राष्ट्रपतींचे स्वागत करण्यात आले. सर्वेश जैन यांनी बाहुबली गीत सादर केले. कृषिमंत्री ए. मंजू यांनी स्वागत केले. राष्ट्रीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, संस्कार मंच, वीर महिला मंडळ, वीर सेवा दल आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.