Sun, May 19, 2019 14:48
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ‘बांध’काम अधिकारी ‘मोकाट’

‘बांध’काम अधिकारी ‘मोकाट’

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 13 2018 8:37PMबेळगाव: प्रतिनिधी

महापालिकेची वॉर्डनिहाय विकासकामे रखडली असून, त्यावरून शुक्रवारी बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य संतप्त झाले. मात्र, अधिकारीच बैठकीला गैरहजर राहिल्याने सदस्यांना धुसफूस करण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे येत्या 18 रोजी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय अध्यक्ष मोहन भांदुर्गे यांनी घेतला.बैठक पुढे ढकलण्यापूर्वी  हेस्कॉमने भूमिगत विद्युत केबल घालण्यासाठी शहरातील रस्त्यांची खोदाई केल्याबद्दल मनपाला 17 कोटी रुपयांची रक्कम द्यावयाची आहे. तर मनपाने हेस्कॉमला सुपरविझन चार्जबद्दल 9 कोटी रुपयांची रक्कम द्यावयाची आहे. या रकमेबद्दल मनपाच्या अभियंत्यांनी सविस्तर चौकशी करून त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून भांदुर्गे यांनी तो विषय पुढे ढकलला. बेळगाव शहरामध्ये वॉर्डवाईज विकास कामे झाली नसल्याबद्दल बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्वच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत व त्या कामासाठी प्रथम कंत्राटदार निश्‍चित करण्यात यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. शहरातील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे बुजविण्याकरिता मनपातर्फे एकूण 52 लाख रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे. प्रत्येकी 13 लाख रुपयाप्रमाणे चार विभागामध्ये खड्डे बुजविण्याकरिता 52 लाख खर्च केले जाणार आहेत. माळमारुती  व हनुमाननगर  भागामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता यावर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला गेल्याने आता खड्डे बुजविण्याकरिता निधीची आवश्यकता काय? असा प्रश्‍नही अध्यक्षांना विचारण्यात आला. त्यामुळे या विषयावर पुढील बैठकीत विचारविनमय करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर विषयपत्रिकेवर नारळ वृक्षाबद्दल घेण्यात आलेल्या विषयावर चर्चा करण्यात येणार होती. परंतु मनपा उद्यान विभागाची देखभाल करणारे अभियंताच या बैठकीला गैरहजर राहिल्याने अध्यक्ष मोहन भांदुर्गे यांनी सदर बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. गणेशोत्सवापूर्वी शहरातील बंद पडलेल्या पथदीपांचा प्रथम सर्व्हे करावा व पथदीप आणि हायमास्टची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचनाही बैठकीमध्ये करण्यात आली आहे. बैठकीला नगरसेवक मीना वाझ, विनायक गुंजटकर, रमेेश कळसण्णावर, मैनाबाई चौगुले, डॉ. दिनेश नाशीपुडी व काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते. 

चर्चा या मुद्यांवर

खड्डे बुजवण्यासाठी 52 लाख
गणेशोत्सवापूर्वी 
खड्डे बुजवणार
गणेशोत्सवापूर्वी पथदीप दुरुस्ती