Sat, Feb 23, 2019 18:38होमपेज › Belgaon › निवडणुकीसाठी पोलिस खाते सज्ज 

निवडणुकीसाठी पोलिस खाते सज्ज 

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 1:23AMखानापूर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाला पोलिस खात्याकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. निर्भयपूर्ण वातावरणात निवडणुका होण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलण्यात येत आहेत. पोलिस खात्याने त्यादृष्टीने पूर्ण सज्जता चालविली असल्याची माहिती राज्य पोलिस महासंचालक निलमणी राजू यांनी दिली.

खानापूर पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या रौप्यमहोत्सवास त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध घटनांबाबत पोलिस खात्याची भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार गौरी लंकेश व कलबुर्गी हत्येप्रकरणी तपासाची दिशा काय आहे? यावर त्या म्हणाल्या, नवीनकुमार नामक संशयिताला ताब्यात घेऊन एसआयटीमार्फत चौकशी केली जात आहे. याकामी तपास यंत्रणांना निःपक्षपणे काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विचारवंतांच्या हत्येसंदर्भात नवीनकुमार याच्याकडून काही माहिती मिळाली आहे का? असे विचारता अद्याप तशी माहिती मिळाली नसून महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनी मागणी केल्यास नवीनकुमारला तेथील तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले.

बेळगाव पोलिस आयुक्तालय कामाला लवकरच प्रारंभ

बेळगावमधील अवैध कत्तलखान्यांवरील कारवाईत कोणाचीही हयगय केली जाणार नाही. यासंदर्भात पोलिसांच्या कामगिरीबद्दल कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असे सांगितले. बेळगावात  पोलिस आयुक्तालय मंजूर झाले. मात्र कार्यालय निर्मितीसाठी अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे विचारल्यानंतर आवश्यक निधीही मंजूर झाला आहे. मात्र जागेच्या निश्‍चितीअभावी काम रखडले आहे. ते त्वरित सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

खानापुरातील प्रशिक्षण केंद्रासाठी दहा वर्षापूर्वी मन्सापूरजवळ 109 एकर जागा शासनाने मंजूर केली आहे. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाही झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच आद्यतेनुसार राज्यातील प्रशिक्षण केंद्रांचा विकास केला जात असून याकामी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.