Sun, Jul 21, 2019 08:36होमपेज › Belgaon › कौल कुणाला!

कौल कुणाला!

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 11:36PMबंगळूर : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या. कर्नाटक विधानसभेसाठी गेला महिनाभर सुरू असलेला जोरदार प्रचार गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संपला. भाजप, काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाने आपली सर्व शक्‍ती या प्रचारात पणाला लावली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळूरमध्ये मतदारांशी संवाद साधला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अ‍ॅपद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो झाला, तर तुम्ही मला मतदान केले तरच मी जास्त काळ जगेन, असे विचित्र आवाहन निजद अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केले.

एकूण 224 जागांपैकी 223 जागांवर शनिवारी (दि. 12) मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. एका मतदारसंघातील निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे 223 मतदारसंघांत एकूण 2,655 उमेदवार रिंगणात आहेत. 4.96 कोटी मतदार असून त्यापैकी 2.52 कोटी पुरुष आणि 2.44 कोटी महिला मतदार आहेत. यंदा 15 लाख नवे मतदार आहेत. 18 ते 19 वर्षे वय असणारे हे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

कर्नाटक काँग्रेसमुक्‍त करा, हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. तर न खाऊँगा, न खाने दुँगा अशी घोषणा करणार्‍या नरेंद्र मोदींना बी. एस. येडियुराप्पा हा कलंकित नेता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कसा चालतो, हा काँग्रेसच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. देवेगौडांच्या निजदने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बाजूला करण्याचा मुद्दा पुढे रेटला.सध्या पंजाबसारख्या मध्यम आकाराच्या राज्यातच काँग्रेसचे अस्तित्व उरले आहे. त्यामुळे कर्नाटकची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.  निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली होती. काँग्रेस, भाजपसह धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन  एकमेकांवर टीका केली.  गेल्या पंधरवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकात तळच ठोकला होता. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही प्रचारसभांमधून केंद्र सरकारचे वाभाडे काढले.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप, काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह 23 नेते, 19 केंद्रीय मंत्र्यांचे 38 विधानसभा मतदार संघांत रोड शो आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते.