Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Belgaon › कुत्रे मेले तरी मोदी यांनी उत्तर द्यावे का?

कुत्रे मेले तरी मोदी यांनी उत्तर द्यावे का?

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:44PMबंगळूर : प्रतिनिधी

वादग्रस्त विधाने करून खळबळ माजविणारे श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक आता नव्या वादात अडकले आहेत. ‘कर्नाटकात कुत्रे मेले तरी त्यावर पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावे लागणार काय?’ असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, अप्रत्यक्षरीत्या त्यांनी गौरी लंकेश प्रकरणाची तुलना कुत्र्याशी केल्याचे मानले जात आहे. त्यावरून टीकाही होत आहे.

बंगळुरात पत्रकार परिषदेत मुतालिक यांनी वरील वक्‍तव्य केले. ते म्हणाले, केंद्रामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर असताना कर्नाटक आणि महाराष्ट्रात हत्या घडल्या.डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी कुणीच काँग्रेसला याबाबत जाब विचारला नव्हता. आता हिंदू संघटनांनी त्या हत्या केल्याचा आरोप होत आहे. शिवाय मोदींना जाब विचारला जात आहे.  आता केंद्रात भाजप सरकार आहे, म्हणून असे प्रश्‍न केले जात आहेत. हे योग्य नाही.

काँग्रेसचे सरकार असणार्‍या राज्यांमध्येही काही पत्रकारांच्या हत्या झाल्या. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्या. त्याबद्दल काँग्रेस नेत्यांना कधीच जाब विचारला गेला नव्हता. पण आता पंतप्रधान अजूनही गप्पच का, असा जाब विचारला जात असल्याबद्दल मुतालिक यांनी नाराजी व्यक्‍त केली.

काँग्रेसने मुतालिक यांच्या विधानाचा ट्विटरवर निषेध केला आहे. पक्ष प्रवक्‍ता मनीष तिवारी यांनी एका प्रसिद्ध आणि पुरोगामी विचारांच्या पत्रकाराची तुलना कुत्र्याबरोबर करणे दुर्दैवी असल्याचे ट्विट केले आहे.

कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई : मुख्यमंत्री कुमारस्वामी

प्रमोद मुतालिक असो की अन्य कोणी, कायद्याचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कुणीच मोठे नाही, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. मुतालिक यांचे वक्तव्य आणि त्यांचे परशुराम वाघमारेशी संबंध असण्याचा आरोप झाल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.