Thu, Jun 20, 2019 02:16होमपेज › Belgaon › वीजदरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने का?

वीजदरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने का?

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 19 2018 9:01PMबेळगाव : प्रतिनिधी

पेट्रोल दरवाढीपाठोपाठ वीजदरवाढीचा शॉक राज्य सरकारने दिला आहे. यामुळे जूनमध्ये आलेल्या बिलाची रक्कम पाहून सर्वसामान्य नागरिकांची बोबडी वळली आहे. कारण बिलात 150 ते 300 रु. तफावत आहे. गत महिन्याचे बिल भरुनसुध्दा बिलात अरिअर्स रक्कम दाखविण्यात आल्याने सर्वसामान्य बुचकळ्यात पडले आहेत.त्यामुळे वीजदरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने का? असा सवाल होत आहे.
हेस्कॉमने एप्रिल महिन्यातच दरवाढीचा प्रस्ताव कर्नाटक राज्य विद्युत मंडळाकडे ठेवला होता. मात्र शासनाने निवडणूक व आचारसंहितेचे कारण देत हिरवा कंदिल दाखविला नव्हता. हेस्कॉमने जानेवारीतच सुधारित वीजदरवाढीचा चार्ट तयार केला होता. निवडणूक संपताच दरवाढीचा शॉक जनतेला बसला. 

बिलाची रक्कम 150 ते 300 रुपयाच्या फरकाने आल्याने नागरिक बुचकळ्यात पडले. किती टक्के वीज दरवाढ झाली, युनिटमागे किती वाढ होणार, हे सर्व गणित हेस्कॉमने गुपितच ठेवले. यापूर्वी 30 युनिटच्या आत विजेचा वापर केला तर 3 रु. 25 पैसे दर होता. आता तो 4 रु.48 पैशाने वाढला आहे. यामुळे 1 रु. 23 पैशाचा वाढीव फरक झाला आहे. 

ग्रामीण विजेचा दर युनिटमागे 3 रु. 15 पैसे होता. तो आता 4 रु. 38 पैसे झाला आहे.  यामुळे एका युनिटमागे यापूर्वी 20 पैसे वाढ होती, ती आता 25 पैसे झाली आहे. शहरी व ग्रामीण युनिटमागे 1 रु.23 पैशाची वाढ झाली आहे. तात्पुरते मीटर वापरणार्‍यांचा युनिट दर यापूर्वी 10 रु. होता. तो आता 11 रु. 23 पैसे झाला आहे. व्यावसायिक दर युनिटमागे 8 रु. 25 पैसे होता, तो आता 9 रु.58 पैसे झाला आहे. शिक्षण संस्था, हॉस्पिटलसाठी यापूर्वी 1 लाख युनिटसाठी 6 रु. 40 पैसे दर होता तो आता 7 रु. 63 पैशावर पोहोचला आहे.