होमपेज › Belgaon › फरार पोस्टमास्तर गजाआड

फरार पोस्टमास्तर गजाआड

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 11:39PMनिपाणी : प्रतिनिधी

तवंदीतील ग्रामस्थ व ठेवीदारांना 25 लाख रुपयांचा गंडा घालून गेल्या 7 महिन्यांपासून फरार असलेला पोस्टमास्तर सिद्धाप्पा गुळाप्पा-पाटील (रा. कुरणी, ता. हुक्केरी, सध्या रा.कणगला) याला निपाणी ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेळगावात गजाआड केले.

पाटील याने गावातील ठेवीदारांचे  सुमारे 25 लाख रुपये हडप केल्याची  तक्रार गेल्या 22 मार्च रोजी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली. त्यानुसार चिकोडी पोस्ट कार्यालयाचे मुख्याधिकारी इराणा रामचंद्र मुत्नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फरार पाटील याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएसआय निंगनगौडा पाटील यांनी दिली.

15 वर्षापासून तवंदी पोस्ट कार्यालयाचे काम पाहणारे सिध्दाप्पा पाटील यांनी नागरिकांचा विश्‍वास संपादन करीत सन 2015-16  व सन 2016-17 या दोन वर्षात 30 जणांच्या ठेवी घेतल्या होत्या. पण त्यांना खोटी पासबुके दिली होती. मुदत संपल्यानंतर संबंधित नागरिकांनी चौकशी केल्यावर खात्यावर रक्‍कमच नसल्याचे उघडकीस आले.पाटीलने 11 जानेवारीपासून  पोस्ट कार्यालयाला येणे टाळले. त्यामुळे ठेवीदारांनी निपाणी, चिकोडी पोस्ट कार्यालयात तक्रार देण्यात आली होती.

मे 2018  मध्ये मुख्याधिकारी मुत्नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार पाटील यांनी सीपीआय किशोर भरणी यांच्या मागदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करून गुप्तता पाळीत फरार पोस्टमास्तर सिध्दापाला शुक्रवारी बेळगावातून अटक केली.त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता.त्याची निपाणी न्यायालयाने हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती पीएसआय पाटील यांनी दिली.

पोस्टमास्तर गुळाप्पा-पाटील याने केलेल्या फसवणुकीची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारी न्यायालयाकडे अर्ज दाखल करून संबंधिताची सखोल चौकशी करणार आहे.- निंगनगौडा पाटील, पीएसआय