Thu, May 28, 2020 09:26होमपेज › Belgaon › ‘पोस्ट कार्ड न्यूज’ची पुन्हा वादग्रस्त पोस्ट

‘पोस्ट कार्ड न्यूज’ची पुन्हा वादग्रस्त पोस्ट

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 11:41PMबेंगळूरू : वृत्तसंस्था 

मुस्लीम युवकाने जैन साधूवर हल्ला केल्याची खोटी बातमी सोशल मीडियातून व्हायरल केल्याच्या आरोपाखाली मार्च 2018 मध्ये तुरुंगाची हवा खावी लागलेल्या ‘पोस्ट कार्ड’ न्यूज या वेबसाईटचे महेश हेगडे आणखी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आले आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे नेते एम. बी. पाटील यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र अशी हेगडे यांची बनावटगिरी उघड झाली आहे. कर्नाटकातील लिंगायतांमध्ये फूट पाडण्यात ग्लोबल ख्रिश्‍चन कौन्सिल आणि वर्ल्ड इस्लामिक ऑर्गनायाझेशन यांचा हात असल्याचे दाखविणारे हे पत्र आहे. हेगडे यांनी हे बनावट पत्र ‘मॅसिव्ह एक्स्पोज’ म्हणून व्हायरल केले आहे. 

जैन साधूवर हल्ल्याच्या ‘फेक न्यूज’ प्रकरणात हेगडे जामिनावर बाहेर आहेत. आता त्यांनी बिजापूर लिंगायत असोसिएशनचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांच्या नावे फोटोशॉप लेटरचा उपद्व्याप केला आहे. या बनावट पत्रानुसार, सध्याची कर्नाटक व 2019 सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाटील यांनी मुस्लीम व ख्रिश्‍चनांच्या जागतिक संघटनांच्या मदतीने व्यूहरचना केली आहे. हिंदूंमध्ये जाती व उपजातींच्या आधारे फूट पाडायची आणि ख्रिश्‍चन व मुस्लीम मते एकसंघ करायची, अशी ही व्यूहरचना असल्याचे या बनावट पत्रात दाखविण्यात आले आहे.  

‘पोस्टकार्ड न्यूज’च्या पोस्ट्स नियमित रिट्वीट करणार्‍या व एका लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या रितू राठोड हिनेही हे बनावट पत्र असलेली पोस्ट शेअर केली होती. नंतर मात्र तिने ही पोस्ट डिलीट केली. ते हिंदूना लक्ष्य करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी ख्रिश्‍चन व मुस्लिमांना एकत्र करून देश खड्ड्यात घालत आहेत. आपण हे वेळीच थांबवायला हवे, असे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आला होते. हेगडे यांनी कर्नाटक निवडणुकांसाठीच ही ‘फेक न्यूज’ जाणूनबुजून व्हायरल केल्याचे मानले जात आहे. स्वत: एम. बी. पाटील यांनी हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांनी अजून यासंदर्भात कोणतीही तक्रार पोलिसात दाखल केलेली नाही. मात्र, ते अब्रुनुकसानीचा कायदेशीर दावा दाखल करणार आहेत.

ग्लोबल ख्रिश्‍चन कौन्सिल आणि वर्ल्ड इस्लामिक ऑर्गनायाझेशन अशा संस्थाच जगात अस्तित्वात नाहीत. सारासार विचार न करणार्‍या मतदारांना नजरेसमोर ठेवून हे बनावट पत्र व्हायरल केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. बोंबाबोंब झाल्यानंतर व बिंग उघड झाल्यानंतर पोस्टकार्ड न्यूजफच्या वेबसाईटवरून हे पत्र गायब झाल्याचे ङ्गअल्ट न्यूजफने म्हटले आहे. मात्र, सध्या हे पत्र व्हॉटसअप वर व्हायरल झाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महेश हेगडे यांचे ट्वीटर फॉलोअर आहेत. गेल्यावेळी हेगडे यांना अटक झाली तेव्हा कर्नाटकातील केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे तसेच भाजप राज्य महासचिव रवी यांच्यासह अनेक भाजप नेते त्यांच्या समर्थनार्थ खुलेआम मैदानात उतरले होते.