Fri, Feb 22, 2019 03:46होमपेज › Belgaon › फेसबुक मैत्रीतून दातृत्वाचा झरा 

फेसबुक मैत्रीतून दातृत्वाचा झरा 

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:58AMबेळगाव : प्रतिनिधी

फेसबुकवर झालेल्या मैत्रीच्या माध्यमातून गरीब-होतकरू अशा सुमारे 80 विद्यार्थ्यांना कपडे मिळाले आहेत. त्यासाठी पुढे आली ती एक महिला व्यावसायिक. अनुराधा उमेश भंडारी अशा त्या व्यावसायिकेचे नाव असून त्या जमखंडीत (बागलकोट) कापडाचा व्यवसाय करतात. त्यांनी मच्छेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. 

सोमवारी मच्छेतील मरगाई मंदिरात  80 विद्यार्थ्यांना फ्रॉक, चुडीदार, शर्ट्स व अन्य कपडे वितरीत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, मध्यवर्ती म.ए. समितीचे खजिनदार व तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

टिळकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर मदतीचे आवाहन केले होते. सरकारी शाळांमध्ये जे गरीब, होतकरू विद्यार्थी आहेत, पण ज्यांचे आई-वडील हयात नाहीत वा आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, जे विद्यार्थी चार-पाच किलोमीटरवरून चालत येतात अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून द्या, असे आवाहनात म्हटले होते. 

आवाहनास प्रतिसाद देत फेसबुकवर परिचय झालेल्या जमखंडी येथील अनुराधा भंडारी यांनी स्वेच्छेने मदत करण्याची तयारी दर्शविली. शिवाय मच्छेत जाऊन विद्यार्थ्यांना कपडे प्रदान केले. छोटेखानी समारंभात बोलातना दरेकर म्हणाले, फेसबुक, वॉट्सअपचा वापर गैरकारणांसाठी न करता त्याचा सदुपयोग होण्यासाठी  प्रबोधन करण्याची गरज आहे. अनुराधा भंडारी यांनी सोशियलमेडियाच्या आधारे शैक्षणिक साहित्य वितरीत करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

मरगाळे म्हणाले, अनुराधा भंडारी यांनी गरजू विद्यार्थ्यांना केलेली मदत ही त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. कृष्णा अनगोळकर यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. केदारी करडी यांनी स्वागत केले. माजी ग्रा. पं. अध्यक्ष महादेव मंगणाकर, शिवाजी बस्तवाडकर, राजू चौगुले, सागर कणबरकर, परशराम कणबर्गी, षन्मुख  चोपडे, कृष्णा बाळेकुंद्री, जतीन गुंडोळकर, नेमाणी लाड, मिना लोहार, रेणुका लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.