Sun, Apr 21, 2019 02:40होमपेज › Belgaon › मकर संक्रांतीनंतर राज्यात राजकीय संक्रमण

मकर संक्रांतीनंतर राज्यात राजकीय संक्रमण

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 8:07PM

बुकमार्क करा
 गुरय्या रे.स्वामी

कर्नाटकात मकर संक्रांतीनंतर सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि निजदमध्ये राजकीय हालचालींना आणखी गती मिळणार आहे. सर्वच पक्ष शर्यतीच्या घोड्याच्या शोधात आहेत. अनेक नेते इतर पक्षाच्या संपर्कात आहेत. मकर संक्रांतीनंतर उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याने कर्नाटकात राजकीय संक्रमण अनिवार्य आहे.

कर्नाटकात काँग्रेसकडे असलेली सत्ता हिसकावून काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला जबरदस्त चाप बसण्याची शक्यता असल्याचे सर्व्हेद्वारे स्पष्ट झाले आहे. गुजरात निवडणुकीत हिरो ठरलेले जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर, कन्हैया कुमार कर्नाटकच्या राजकीय रणांगणात धुमाकूळ घालणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबरदस्त आव्हान देणार आहेत.त्यामुळे कर्नाटकचे राजकीय रणांगण देशाचे लक्ष वेधून घेणार आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास निजदला सोबत घेण्याची तयारी भाजपने केली आहे. परंतु एच. डी. कुमारस्वामींनी यासंदर्भात आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. निजदला किती जागा मिळणार, यावरच या पक्षाचे राजकीय भवितव्य अवलंबून  आहे. काँग्रेस अथवा भाजपला स्वबळावर सत्ता हस्तगत करण्यात अपयश आल्यास कुमारस्वामी किंगमेकर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सध्या प्रदेश भाजपात अंतर्गत गटबाजी असून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजकीय संकटात आहेत. म्हादई पाणीवाटप वाद आणि लिंगायत मतदार दुरावल्याचा फटका भाजपला बसत असल्याने याची भरपाई म्हणून प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे, योगी आदित्यनाथ, म्हैसूरचे खासदार प्रतापसिंह, शोभा करंदलाजे यांची अलिकडील आक्रमक वक्तव्ये भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सध्या जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात राजकीय संघर्षाची सर्व लक्षणे स्पष्टपणे दिसून येत आहेत. 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या अल्पसंख्याक, दलित मते टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. मागील वर्षभरात झालेल्या लिंगायत चळवळीचा राजकीय लाभ काँग्रेसला झाल्याचे दिसून येते. कर्नाटकच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका अनेकवेळा महत्वाची ठरली आहे.निजदमध्ये आणखी फूट पडण्याची शक्यता असल्याने कुमारस्वामी सध्या चिंतेत आहेत. काँग्रेस, भाजप आणि निजद वगळता इतर कोणत्याही पक्षाचे राजकीय वर्चस्व राज्यात नाही.