होमपेज › Belgaon › कर्नाटक : लग्नाच्या दारात, नेत्यांची ‘वरात’

कर्नाटक : लग्नाच्या दारात, नेत्यांची ‘वरात’

Published On: Apr 22 2018 4:06PM | Last Updated: Apr 22 2018 4:06PMबेळगाव : प्रतिनिधी

ऐन लग्नसराईच्या काळातच विधानसभा निवडणुकींंचा बार उडणार आहे. याचा फायदा उमेदवाराकडून घेण्यात येत आहे. लग्नसमारंभात पांढर्‍या कपड्यातील नेत्यांसह त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय उपस्थिती  दिसून येत आहे. यामाध्यमातून मतांची बेजमी करण्याचा प्रयत्न नेतेमंडळीकडून सुरू आहे. परिणामी लग्नाच्या दारात उमेदवारांची ‘वरात’ पाहावयास मिळत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका 12 मे रोजी पार पडणार आहेत. यासाठी उमेदवारी दाखल करण्यात येत असून गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच ठिकाणी राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे. यातच लग्नसराईलादेखील बहर आला आहे.

मागील आठवड्यापासून लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी कमी मुहूर्त उपलब्ध असल्यामुळे मिळेल त्या मुहूर्तावर लग्न उरकण्याचा सपाटा सुरू आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातदेखील लग्न समारंभाची धूम जोरात सुरू आहे.

याचा फायदा उमेदवाराकडून घेण्यात येत आहे. मतदार संघातील प्रत्येक लग्नसमारंभाला उपस्थिती दर्शविण्यात येत आहे. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचे लटांबर असत आहे. यामुळे काही लग्नासमारंभात वधू-वराच्या नातेवाईकांच्या उपस्थितीपेक्षा कार्यकर्त्यांचीच उपस्थिती अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

य ामाध्यमातून वधू-वरांच्या हातात भरभक्‍कम रक्‍कमेची भेट मिळत आहे. यामुळे कार्यकर्तेही नेत्यांना लग्नपत्रिका आवर्जून पोहोचवत आहेत. लग्नाचे मुहूर्त एकाचवेळी असल्यामुळे अनेक लग्नांना वेळेत भेट देताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे. कांही कार्यकर्त्यांच्या हळदीला हजेरी, दुसर्‍याला केवळ भेट तर तिसर्‍याच्या लग्नात जेवण, पुजेला उपस्थिती असा प्रकार सुरू आहे. कार्यक्रमाना नेत्यांने हजेरी लावल्यामुळे कार्यकर्त्यांचीही हजेरी अभिमानाने फुगून येत आहे. यातून मतांची पेरणी करण्याचे काम नेत्यांकडून पद्धतशीरपणे सुरू आहे.

लग्नसमारंभाबरोबर साखरपुडे, पुजा, गृहप्रवेश, बारसे, नामकरण सोहळे, वाढदिवस अशा कार्यक्रमानादेखील नेत्यांची उपस्थिती पाहावयास मिळत आहे. एखाद्याच्या मरणानंतर स्मशानात उपस्थिती दर्शवून श्रद्धांजली वाहणार्‍या नेत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मतांच्या बेजमीसाठी पाहिजे ते करण्याची प्रवृती नेत्यांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे.

Tags : Karnataka, Election, Leaders, Attend, Wedding,